दारू ढोसून आणि गांजा फुंकून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या तिघांवर पोलिसांनी कारवाई केली.File Photo
Published on
:
18 Nov 2024, 2:08 pm
Updated on
:
18 Nov 2024, 2:08 pm
डोंबिवली : दारू ढोसून आणि गांजा फुंकून सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा घालणाऱ्या तिघांची नशा पोलिसांनी उतरवली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेही कायदा शांतता आणि संस्थेचा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. अशावेळी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघेजण नशेमध्ये धुंद होऊन सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा करताना आढळून आले. या तिघांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत सर्वत्र कायदा, शांतता आणि सुव्यव्यवस्था राखणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर मानपाडा पोलिस गस्त घालत असताना शनिवारी तीन वेगळ्या ठिकाणी तिघे नशेखोर दारू ढोसून आणि गांजा फुंकून सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचे आढळून आले. कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या गोळवली गावात राहणारा सागर कसबे हा अंडा-बुर्जीचा व्यवसाय करतो. शनिवारी रात्री गोळवलीतील पांडुरंगवाडी भागात सागर कसबे हा दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी धिंगाणा करताना आढळून आला. गस्तीवरील पोलिस हवालदार अशोक आहेर यांनी सागर कसबे याच्या विरूद्ध दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत दारू ढोसून राजेश सरोदे हा रिक्षावाला गोळवलीमध्ये सार्वजनिक रस्त्यावर धिंगाणा घालत असल्याचे आढळून आल्यानंतर गस्तीवरील पोलिसांनी त्याचीही उतरवली. सूचकनाक्यावरील भीमनगर भागात राहणाऱ्या राजेश याच्या विरूद्ध हवालदार अशोक आहेर यांनी फिर्याद दाखल केली आहे.
तिसऱ्या घटनेत कल्याण-शिळ महामार्गावरील टाटा पॉवर परिसरात असलेल्या पिसवली गावात राहूल कसबे हा आडोशाला, पण सार्वजनिक ठिकाणी गांजाचे ओढताना गस्तीवरील पोलिसांना आढळून आला. कल्याण पश्चिमेत राहणारा राहूल मोलमजुरी करतो. सार्वजनिक ठिकाणी अंमली पदार्थाचे सेवन केल्याने त्याच्या विरोधात हवालदार नाना चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सार्वजनिक ठिकाणी दारू, चरस, गांजा, अफू, गर्दा, तसेच प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ विकणाऱ्यांसह रस्ते आणि फुटपाथ बळकावून हातगाड्यांजवळ ज्वलनशील शेगड्या, गॅसचे सिलिंडर लावून खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांवर परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कारवायांचे आदेश दिले आहेत. वरिष्ठांच्या आदेशांनुसार आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीत चालणाऱ्या गैरधंद्यांना चाप बसला आहे. पोलिसांनी गुंड, गुन्हेगार आणि गैरधंदे करणाऱ्यांच्या विरोधात जोरदार मोहीम राबवल्यामुळे सर्वसामान्य रहिवाशांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.