Published on
:
25 Nov 2024, 6:34 am
Updated on
:
25 Nov 2024, 6:34 am
भिवंडी : भिवंडीतील तीन विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकीचे धक्कादायक निकाल समोर आले आहे. एकूण 32 उमेदवारांपैकी 21 उमेदवारांना नोटा पेक्षा कमी मते मिळाली आणि त्यांची अनामत रक्कम जप्त झाली. या निकालामुळे स्थानिक राजकारणात खळबळ तर निर्माण होत आहेच, पण लोकांच्या बदललेल्या मानसिकतेवर आणि राजकीय पक्षांच्या रणनीतीवरही प्रश्न उपस्थित होत आहे.
भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपचे महेश चौघुले यांनी 31,293 मतांनी विजय मिळवून विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण केली. या मतदारसंघात 1072 मतदारांनी नोटा केले. त्यापेक्षा कमी मिळालेल्या 14 उमेदवारांपैकी 9 उमेदवारांना आपले डिपॉझिट गमवावे लागले. त्यांना नोटा पेक्षा देखील कमी मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला.
भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी संतोष शेट्टी यांना कडवी झुंज दिली आणि त्यांचा 51,784 मतांनी पराभव करत दुसर्यांदा विजय मिळवला. येथे 738 मतदारांनी नोटाला पसंती दिली. या मतदारसंघात एकूण 11 उमेदवारांपैकी 8 उमेदवारांना नोटा पेक्षादेखील कमी मते मिळाल्याने ते त्यांची अनामत रक्कम वाचवू शकले नाहीत. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे (शिंदे गट) शांताराम मोरे यांनी त्यांच्या प्रतिस्पर्ध्याचा 57,962 मतांनी पराभव करत तिसर्यांदा विजय मिळवला. येथे 2571 मतदारांनी नोटा केले. या मतदारसंघात एकूण 7 उमेदवारांपैकी 3 उमेदवार असे होते त्यांना नोटा पेक्षा कमी मते मिळाल्याने ते डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. तर भिवंडीतील तीन मतदारसंघात नोटा मुळे पराभूत झालेल्या अन्य एका उमेदवारासह एकूण 21 उमेदवारांमध्ये काही नामवंत पक्षाच्या उमेदवारांचा समावेश आहे.
मनपा निवडणुकीवर होणार परिणाम
या उमेदवारांच्या पराभवामुळे पुढील मनपा निवडणुकीच्या राजकारणात परिणाम होणार आहे. मतदार आता केवळ औपचारिक उमेदवारांना स्वीकारण्यास तयार नसल्याचे या निकालावरून दिसून येते. हे निकाल राजकीय पक्षांना इशारा देणारे ठरतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. आता केवळ निवडणूक समीकरणच नव्हे, तर उमेदवारांची प्रतिमा आणि सार्वजनिक समस्यांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन याला महत्त्व प्राप्त होणार आहे.