Published on
:
18 Nov 2024, 5:21 am
Updated on
:
18 Nov 2024, 5:21 am
ठाणे : 36 जिल्ह्यांच्या महाराष्ट्रात आतापर्यंत गोवा राज्यासह केवळ वीसच राज्य नाट्य स्पर्धेची केंद्रे होती. हौशी रंगकर्मीच्या वतीने सातत्याने होणारी मागणी लक्षात घेवून सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने यंदाच्या स्पर्धेपासून 5 नवीन केंद्रांची भर पडली आहे. सातारा, सिंधुदुर्ग, अकोला, बीड, लातूर या जिल्ह्यात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र मिळाले असल्याने स्थानिक कलाकारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचे परीक्षण करणार्या परीक्षकांच्या मानधनातही दुपटीने वाढ करण्यात आली आहे.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणार्या राज्य नाट्य स्पर्धेने हीरक महोत्सवी वर्षेात पर्दापण केले आहे, या स्पर्धेने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला अनेक दिग्गज कलावंत दिले आहेत, मात्र राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी कलाकारांना व्यासपीठ मिळविण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांत होणार्या राज्य नाट्य स्पर्धेच्या केंद्राचा आसरा घ्यावा लागतो. नाट्यवर्तुळात सांस्कृतिक कला संचालनालयाच्या वतीने आयोजित करण्यात येणार्या राज्य नाट्य स्पर्धेला मानाचे स्थान आहे. या स्पर्धेने रंगभूमीला कलावंतांचे भरभरून दान दिले आहे, त्यामुळे हौशी कलाकार या स्पर्धेची पायरी चढण्यासाठी दरवर्षी वाट पहात असतात. राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी 19 जिल्ह्यातच या स्पर्धेचे केंद्र होते. दोन जिल्हे जोडून एक केंद्र असायचे. त्यामुळे आजूबाजूच्या जिल्ह्यातील स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जवळच्या केंद्रावर जावे लागत असे. सातत्याने केंद्रांची मागणी होणार्या सातारा,सिंधुदुर्ग, अकोला, बीड, लातूर या जिल्ह्यात आता राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र यंदाच्या स्पर्धेपासून सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर परीक्षकांच्या मानधन 450 वरून 900 रूपये करण्यात आले आहे.
सातारा शहरात राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र होते, पण वाद झाल्यामुळे ते बंद करण्यात आले, त्याला 33 वर्षे झाली, त्यानंतर कराडला स्पर्धेचे केंद्र देण्यात आले, स्पर्धेची नियमावली आणि इतर कारणामुळे या केंद्रावर अपेक्षित प्रतिसाद स्पर्धेला मिळत नसल्याने 2005 ला हे केंद्रही बंद झाले. त्यामुळे जिल्ह्यातील हौशी नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी सांगली किंवा पुणे कुठेही सादरीकरणाची संधी मिळत होती, पण सातार्यात केंद्र नसल्याने एकूणच जिल्ह्यातील नाट्य चळवळीला मरगळ आली होती, आता केंद्र पुन्हा सुरू झाल्याने कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
बाळकृष्ण शिंदे, कलाकार - सातारा
राज्य नाट्य स्पर्धेेच्या केंद्रासाठी कलाकार आणि संस्थांकडून होणारी मागणी लक्षात घेवून सातारा, सिंधुदुर्ग, अकोला, बीड, लातूर या 5 जिल्ह्यात केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.
विभीषण चवरे, संचालक - सांस्कृतिक कार्य संचालनालय