Published on
:
08 Feb 2025, 6:33 am
Updated on
:
08 Feb 2025, 6:33 am
कोथरूड: भारतीनगर ते भीमाले टॉवरदरम्यान असलेल्या नाल्यात गेल्या पाच दिवसांपासून दररोज 4 ते 5 डुकरे मृत अवस्थेत आढळत आहेत. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या डुकरांच्या मृत्यूचे नेमके गूढ काय? आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी तपासणी करून महापालिकेने उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोथरूड क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त विजय नायकल, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, आरोग्य कर्मचारी व स्थानिक नागरिक यांनी या जागेची नुकतीच पाहणी केली. भाजप युवा मोर्चा शहर सरचिटणीस दुष्यंत मोहोळ म्हणाले की, डुकरांचा मृत्यू नेमका कशामुळे होतो याचा तपास होणे आवश्यक आहे. परिसर निर्जंतुकीकरण करत त्वरित नाल्याची साफसफाई करून घेण्यात यावी. तसेच परिसरात कोणताही साथीचा आजार पसरू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
नायकल म्हणाले की, भारतीनगर परिसरात मृत्यू झालेली डुकरे त्वरित उचलण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. डुकरांचा मृत्यू कशामुळे झाला असावा याचा देखील तपास करण्यात येईल. तसेच क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील डुकरांचा बंदोबस्त करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.