मानपाडा रोडवर तिघांचा स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला केला. Pudhari News Network
Published on
:
27 Nov 2024, 12:38 pm
Updated on
:
27 Nov 2024, 12:38 pm
डोंबिवली : पुढारी वृत्तसेवा : डोंबिवलीच्या पूर्वेकडील नेहमीच गजबजलेल्या मानपाडा रोडला मंगळवारी रात्रीच्या सुमारास एक घटना घडली. हॉटेलमधील काम संपवून घरी चाललेल्या स्वयंपाक्याच्या तोंडावर ठोसा मारून हातातील मोबाईल लांबविण्याचा एका बदमाशाने प्रयत्न केला. या तरूण स्वयंपाक्याने पाठलाग करून लुटारूला पकडून जखडून टाकले. मात्र आपल्या साथीदाराला सोडविण्यासाठी कारमधून आलेल्या त्रिकुटाने स्वयंपाक्यावर जीवघेणा हल्ला केला. स्वयंपाकी रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर आडवा झाल्याची संधी साधून हल्लेखोर चौकडीने कारमधून पळ काढला.
धर्मेंद्रकुमार रामनरेश राम ( वय 28) असे हल्ल्यात जबर जखमी झालेल्या स्वयंपाक्याचे नाव असून तो मानपाडा रोडला असलेल्या गणेश नगरमध्ये राहतो. जखमी धर्मेंद्रकुमारने दिलेल्या जबानीवरून मानपाडा पोलिसांनी फरार चौकडीच्या विरोधात गुन्हा नोंदवून तपासचक्रांना वेग दिला आहे.
धर्मेंद्रकुमार हा मानपाडा रोडला असलेल्या एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करतो. मंगळवारी रात्री साडेदहाच्या सुमारास काम संपवून तो भावाच्या घरी चालला होता. मोबाईलवर बोलत चाललेला धर्मेंद्रकुमार स्टार कॉलनीतील मित्तल वाईन शॉपसमोर येताच पाठीमागून आलेल्या लुटारूने त्याच्या तोंडावर ठोसा मारून मोबाईल खेचून पोबारा केला. प्रसंगावधान राखून धर्मेंद्रकुमार याने पाठलाग करत लुटारूला पकडून जखडले. आपला साथीदार पकडला गेल्याचे पाहून भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या कारमधून तिघे बदमाश उतरले. या बदमाशांनी धर्मेंद्रकुमारला लाथा-बुक्क्यांनी झोडपयला सुरूवात केली. तरीही धर्मेंद्रकुमार बदमाशांशी दोन हात करत हल्ला परतवून लावण्याचा प्रयत्न करत होता.
अखेर बदमाशांनी त्यांच्याकडील धारदार हत्याराने हल्ला चढविला. या हल्ल्यामुळे धर्मेंद्रकुमारची त्या लुटारूवरील पकड ढिाली झाली. हत्याराचे घाव वर्मी बसल्याने धर्मेंद्रकुमार रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर आडवा झाला. हे पाहून चौघा बदमाशांनी कारमधून पळ काढला. चार हल्लेखोर आणि एकटा स्वयंपाकी धर्मेंद्रकुमार यांच्यात संघर्ष सुरू असल्याचे रस्त्यावरील पादचारी उघड्या डोळ्यांनी पाहत होते. मात्र धर्मेंद्रकुमारला वाचविण्यासाठी त्यातील कुणीही पुढे आला नाही. लुटारू पसार झाल्यानंतर जखमी धर्मेंद्रकुमारला उचलून दवाखान्यात दाखल केले. वेळीच उपचार मिळाल्याने त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील छब्यांचा आधार
पोलिसांनी घेतलेल्या जबानीनुसार हल्लेखोर चौकडीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवाजी बडे आणि त्यांचे सहकारी फरार हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हल्लेखोरांना हुडकून काढण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेतला आहे. कॅमेऱ्यांत कैद झालेल्या छब्यांच्या आधारे पोलिसांची पथके फरार बदमाशांच्या मागावर असून लवकरच गजाआड असतील, असा पोलिसांनी विश्वास व्यक्त केला.