ढोरकीनच्या जि.प. हायस्कूलचे बांधकाम सुरू:सळया वाकवण्यासाठी झाडांना ठोकले खिळे, सव्वाचार कोटी रूपयांचा निधी

3 hours ago 2
पैठण तालुक्यातील ढोरकीन येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या नवीन इमारत बांधकामासाठी सव्वाचार कोटी रुपयांचा निधी मंजूर करत बांधकामाला सुरुवात झाली आहे. यासाठी लागणाऱ्या सळया वाकवण्यासाठी शाळेतील लिंबाच्या झाडाला शेकडो खिळे ठोकण्यात आल्याने वृक्षप्रेमींतून नाराजी व्यक्त केली जात आहे. पैठण-संभाजीनगर मुख्य रस्त्यालगत ढोरकीन गावापासून पश्चिमेस हाकेच्या अंतरावर समाजकल्याण कॉलनी येथील वळण रस्त्याजवळ ही शाळा आहे. इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग एका बाजूला तर इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग एका बाजूला अशी ही जुनाट १३ वर्गखोल्या असलेली मराठी व उर्दू माध्यमाची शाळा होती. याअगोदर ठेकेदारांनी वारंवार शाळेची थातूरमातूर दुरुस्ती केल्याने समस्या जैसे थेच राहिल्या होत्या. परिणामी शिक्षण विभागाने जुनाट वर्गखोल्या पाडून नव्याने बांधकाम करण्यासाठी चार कोटी दहा लाखांचा निधी मंजूर केला आहे. बांधकाम होत असलेल्या या भव्यदिव्य इमारतीत इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे वर्ग एकाच छताखाली असणार आहेत. याचबरोबर शाळेत केंद्र व राज्य शासनाच्या विविध शैक्षणिक व भौतिक सुविधाही विद्यार्थांना येथे एकाच छताखाली मिळणार आहेत. तसेच भविष्यात उच्च माध्यमिक शिक्षणही याच इमारतीत सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. आता लवकरच थोड्या दिवसांवर इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा सुरू होणार आहेत. बांधकाम सुरू असल्याने इतर ठिकाणी विद्यार्थ्यांना आसनव्यवस्था उपलब्ध केली जाणार आहे. जीर्ण झालेल्या १३ वर्गखोल्या पाडून बांधकामास सुरुवात केली आहे. सळया वाकवण्यासाठी पर्यायी व्यवस्था करा एकीकडे शासन, प्रशासन ‘झाडे लावा झाडे जगवा’चे नारे देत आहे, तर ढोरकीन शाळा परिसरातील लिंबाच्या झाडाला शेकडो खिळे ठोकून झाडांना वाळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संबंधित बांधकाम करणाऱ्या यंत्रणेने सळया वाकवण्यासाठी इतर काही पर्यायी व्यवस्था करायला हवी होती असे बोलले जात आहे. भव्यदिव्य इमारत राहणार उभी ^वारंवार पाठपुरावा करून शाळेची भव्यदिव्य इमारत होत आहे. विद्यार्थ्यांना बाजूच्या प्राथमिक शाळेत आसनव्यवस्था उपलब्ध केली आहे. आता जीर्ण इमारत पाडून नवीन बांधकामाला सुरुवात झाली आहे. लवकरच बांधकाम पूर्णत्वास जाईल. -एस. एन. ताकवाले, मुख्याध्यापक

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article