पुणे: शहरात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराचा अचानक शिरकाव झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खासगी रुग्णालयांमध्ये दाखल झालेल्या जीबीएस आजाराच्या रुग्णांच्या रक्ताचे आणि शौचाचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. गुरुवारी उशिरा नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. रुग्णांच्या काही नमुन्यांमध्ये कॅम्पिलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणू आणि काही नमुन्यांत नोरोव्हायरस हा विषाणू आढळून आला आहे.
जीबीएसची लक्षणे दिसून आलेल्या रुग्णांमध्ये दूषित अन्न आणि पाण्यातून लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. लागण कशामुळे झाली, याची तपासणी एनआयव्हीमध्ये करण्यात आली. त्यातून जीवाणू आणि विषाणू आढळून आल्याचे निष्पन्न झाले आहे. दोन्हींचा संसर्ग दूषित अन्न अथवा पाण्यातून होतो.
जीवाणू अथवा विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर रुग्णांमध्ये त्यांची प्रतिकारशक्ती जीवाणूऐवजी शरीरावर हल्ला करते. त्यानंतर 1-3 आठवड्यांनी गुलेन बॅरी सिंड्रोमचे निदान होते, असे वैद्यकतज्ज्ञांचे म्हणणे आहे. जीबीएसचे 67 रुग्ण
शहरात एकूण 67
शहरात गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराचे एकूण 67 रुग्ण सापडले आहेत. यांपैकी 39 रुग्ण पुणे ग्रामीण, 13 रुग्ण पुणे महापालिका आणि 12 रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका व 3 रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत. त्यांपैकी 43 पुरुष व 24 महिला आहेत. यांपैकी 13 रुग्ण व्हेन्टिलेटरवर आहेत.
गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) चे शहराच्या हद्दीतील 46 रुग्णांपैकी 70 टक्के रुग्ण हे सिंहगड रस्त्यावरील धायरी, किरकटवाडी ते खडकवासलापर्यंतच्या भागातील आहेत.
तसेच, 80 टक्के रुग्णांमध्ये आधी उलटी, जुलाब असे पोटविकाराचे (गॅस्ट्रोइंटेस्टायनल) लक्षणांचा इतिहास आहे. काही रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे दिसून येत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.