Published on
:
24 Jan 2025, 11:35 am
Updated on
:
24 Jan 2025, 11:35 am
पूर्णा: येथील पंचायत समिती कार्यालयात उघडकीस आलेल्या पेन्शन घोटाळ्यात एक मोठी अपडेट समोर येत आहे. यात दोषी असलेल्या बिडीओ वानखेडे- मोडके सह तिघांना परभणी जिल्हा सत्र न्यायालयाने ता.२३ जानेवारी रोजी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात मागील पंधरा दिवसांपासून पसार असलेल्या ७ जणांपैकी तिघांना दिलासा मिळाला आहे. तर दोषी लेखापाल संजय पाठक व सहा लेखा मंचक भिसे हे न्यायालयीन कोठडीतच आहेत.
पूर्णा पंचायत समिती कार्यालयातील लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचा-यांच्या पेन्शन व भविष्य निर्वाह निधीमध्ये सुमारे १ कोटी ८४ लाख रुपयांचा पेन्शन घोटाळा उघडकीस आला होता. याप्रकरणी पं.सचे विद्यमान गटविकास अधिकारी मयुरकुमार आंदेलवाड पूर्णा पोलिस ठाण्यात ता.७ जानेवारी रोजी तत्कालिन दोन बिडीओ श्रीमती सुनिता वानखेडे व जे व्ही मोडके यांच्यासह एकूण ९ जणांवर शासकीय निधीचा अपहार करुन फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. यानंतर घटनेतील दोषी लेखाविभागातील संजय पाठक व भिसे यांना चोवीस तासांत जेरबंद करुन न्यायालयासमोर हजर केले होते. त्यात त्यांना काही दिवस पोलिस कोठडी व त्यानंतर न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. याप्रकरणातील सह आरोपी असलेले जयश्री टेलरींग, सोनाजी भोसले, शेख अझहर समद, नागेश नावकीकर हे मात्र पोलीसांच्या हातावर तुरी देऊन पसार आहेत.
घोटाळा प्रकरणात आणखी मोठे धागेदोरे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने तपास अधिकाऱ्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य दिशेने तपास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.