भंडारा: घरबांधणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच मागणाऱ्या सरपंच आणि ग्रामसेवकावर भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा नोंदविला. ही कारवाई भंडारा तालुक्यातील पलाडी येथे २४ जानेवारी रोजी करण्यात आली.
लता संदीप गोस्वामी असे लाचखोर सरपंचाचे नाव असून त्यांना अटक करण्यात आली आहे. तर मिलिंद रुपदास जनबंधू असे ग्रामसेवकाचे नाव असून ते फरार आहेत. यातील तक्रारदार यांचे पलाडी येथे गट क्रं. ४ मध्ये असलेल्या जमिनीमध्ये त्यांना त्यांचे घराचे बांधकाम करायचे होते. यासाठी त्यांनी ग्रामपंचायत पलाडी येथे नोव्हेंबर २०२४ मध्ये अर्ज केला होता. ३१ डिसेंबर रोजी तक्रारदार यांनी दोन्ही आरोपींना भेटून ना हरकत प्रमाणपत्र देण्याबाबत चर्चा केली असता, त्यांनी तक्रारदार यांना सदरचे प्रमाणपत्र देण्याकरिता १५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
तक्रारदार यांचे तक्रारी वरून दिनांक २० जानेवारी रोजी पंचा समक्ष पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान आरोपींनी तडजोडअंती १५ हजार रुपयाची मागणी पंचासमक्ष केल्याचे निष्पन्न झाले. आज २४ जानेवारी रोजी रोजी सापळा कारवाई दरम्यान आरोपी सरपंच लता गोस्वामी यांनी पंचासमक्ष तक्रारदार यांचेकडून १५ हजार रुपये लाच रक्कम स्वत: स्वीकारली. यावरुन पोलिस स्टेशन कारधा येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार, पोलिस निरीक्षक मयूर चौरसिया, पोलिस निरीक्षक अमित डहारे, पोलिस उपनिरीक्षक संजय कुंजरकर, पोलिस हवालदार मिथुन चांदेवार, अतुल मेश्राम, विष्णू वरठी, अभिलाषा गजभिये, चेतन पोटे, मयूर सिंगणजूडे, शिलपेंद्र मेश्राम, नरेंद्र लाखडे, राहुल राऊत यांनी केली.