चिकूला मिळाला उच्चांकी दरPudhari
Published on
:
24 Jan 2025, 6:41 am
Updated on
:
24 Jan 2025, 6:41 am
राहुरी : महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या उद्यान विद्या विभागातील चिकू सध्या चांगलाच ‘भाव’ खात आहे. चिकुच्या विक्रीतून विद्यापीठाला तब्बल 40 लाख रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. दरम्यान, गेल्या वर्षाच्या तुलनेत चिकूच्या महसुलात तब्बल 23 टक्के वाढ झाली आहे, असे सांगण्यात आले.
उत्तम दर्जासह रुचकरतेमुळे विद्यापीठातील चिकुच्या बागा विकत घेण्यासाठी यंदा व्यापार्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. विद्यापीठातील चिकू फळबागांचे बारमाही व्यवस्थापन तांत्रिक व शास्त्रोक्त पद्धतीने केले जाते. चिकुच्या दर्जेदार उत्पन्नासाठी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के व उद्यान विद्या विभागाचे प्रमुख डॉ. भरत पाटील यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. फळबागेच्या योग्य व्यवस्थापनासह अधिक उत्पादनासाठी उद्यान विद्या प्रक्षेत्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सचिन मगर, कनिष्ठ संशोधन सहाय्यक विजय पवार, राहुल पाटील, रमेश अनाप, सचिन शेळके, बाबासाहेब होडगर व कर्मचार्यांनी परिश्रम घेतले आहे.
राहुरीचे चिकू महाराष्ट्रात प्रसिद्ध
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील उद्यान विद्या विभागाच्या प्रक्षेत्रावर कालीपत्ती, क्रिकेट बॉल आदी चिकू वाणांची 10 हेक्टर क्षेत्रावर फळबाग आहे. एकूण 972 उत्पादनक्षम फळझाडे आहेत. या फळांची विक्री ई- निविदा पद्धतीने करण्यात आली. चिकू फळाचे आहारातील वाढते महत्त्व लक्षात घेता, दिवसेंदिवस खवैय्ये ग्राहकांकडून मागणी वाढत आहे. विद्यापीठातील चिकूची फळे उत्तम गुणवत्तेसह चवीसाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत.