Auto Taxi Fare Increases : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महागाई वाढ होत आहे. सध्या जीवनावश्यक वस्तूंसोबतच खाद्यतेल, कडधान्य, पालेभाज्यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. त्यातच गॅसचे दरही वाढले आहेत. त्यामुळेच सर्वसामान्य कुटुंबांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. एकीकडे हातात पैसे शिल्लक राहत नसल्याने आर्थिक जुळवाजुळव करताना नाकीनऊ येत आहेत. त्यातच आता राज्य सरकारने सर्वसामान्यांना आणखी एक झटका दिला आहे. येत्या १ फेब्रुवारीपासून ऑटो रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे.
रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ
मुंबईतील ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ करण्याचा निर्णय संघटनांनी घेतला आहे. ऑक्टोबर २०२२ पासून रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात वाढ झालेली नाही. पण इंधन आणि सीएनजीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. याचा फटका चालकांना बसत आहेत. तसेच अॅप आधारित रिक्षा आणि टॅक्सी कंपन्यांमुळेही मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. इंधन दरवाढ आणि खटुआ समितीच्या शिफारशींचा दाखला देत रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
किती दरवाढ होणार?
यानुसार टॅक्सी आणि ऑटो रिक्षाचे भाडे ३ रुपये प्रतिकिमीने वाढवण्यात येणार आहे. यामुळे रिक्षाचे किमान भाडे २३ वरून २६ रुपये होणार आहे. तर टॅक्सीच्या भाडे २८ वरून ३१ रुपये प्रती किलोमीटर होण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
एसटीची भाडेवाढ होणार
प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक वर्षांपासून एसटीची भाडेवाढ झाली नव्हती, ती भाडेवाढ काल मंजूर केलेली आहे. त्यानंतर 1 फेब्रुवारीपासून टॅक्सी आणि रिक्षाची पण भाडेवाढ होणार आहे. एसटीची भाडेवाढ दर वर्षाला करणं गरजेचं आहे. एसटी प्रशासनाला दर दिवशी 3 कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे. यानुसार महिन्याला 90 कोटी रुपये एसटीचे नुकसान होत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत भाडेवाढीशिवाय पर्याय नाही. मी प्रधान सचिवांना सांगितलेला आहे की भाडेवाढ करत असताना वार्षिक गुणवत्तेवर आधारित ही भाडेवाढ करावी. तसेच टॅक्सी आणि रिक्षाचे तीन रुपये प्रति किलो मीटर भाडेवाढ होणार आहे, असे प्रताप सरनाईक म्हणाले.