मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाचा एल्गार केला आहे. pudhari photo
Published on
:
26 Nov 2024, 12:32 pm
Updated on
:
26 Nov 2024, 12:32 pm
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही. म्हणून माझा समाज आज माझ्या पाठीमागे आहे. आता कोणीही आलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. कोणीही आलं तरी समाजासाठी लढावं लागणार आहे. कोणीही येऊ द्या, तीच सासू आहे. आम्ही तिला वठणीवर आणू शकतो, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी दिला आहे. ते अंतरवाली सराटी येथे आज (दि. २६) पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, पुन्हा दादागिरी किंवा दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला खूप वाईट परिणाम भोगावा लागेल. मराठ्यांच्या नादी लागू नका, असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिला.
लोकसभेला जरांगे फॅक्टरने महायुतीला सुरूंग लावला होता. तसा काही परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसला नाही. महायुतीने, विशेषतः भाजपला एकांगी बहुमत मिळाले. त्यावरून आता राज्यात जरांगे फॅक्टर संपल्याचा दावा करण्यात आला. त्याला जरांगे यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी सरकार गठीत होताच सामूहिक उपोषण करणार असल्याचे आधीच जाहीर केले आहे.
सत्तेत कुणीही आले तरी आम्हाला लढावे लागेल
ते आले काय आणि हे आले काय आम्हाला लढावेच लागणार आहे. ते जरी पुन्हा आले तरी आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार. सरकार काय करते, कोणात किती दम आहे, हे आम्हाला चांगलं माहित आहे. फक्त मराठ्यांची बेइमानी त्यांनी करायची नाही. कारण शेवटी मराठ्यांशिवाय राज्यात कोणाचीही सत्ता येऊ शकत नाही. मराठ्यांनी दोघांचाही काम केलं, जो पडला त्याचाही केलं आणि तो निवडून आला त्याचाही काम केलं. त्यामुळे दोघांनीही मराठ्यांच्या मदतीला यायचं.
तर ८० ते ९० जणांना बुक्का लावला असता
कोणी म्हणत असेल जरांगे फॅक्टर फेल गेला. पण मी त्यांना सांगतो की, मी मैदानातच नव्हतो. जेव्हा मी मैदानात होतो, तेव्हा यांना पाणी पाजलेले आहे. मी जर बाहेर पडलो असतो. तर ८० ते ९० जणांना बुक्का लावला असता. काही उमेदवार फक्त २ हजार ५ हजार, दहा हजार अशा मताने निवडून आलेले आहेत. मी जर एक राऊंड मारला असता तर सगळे उलथे पालथे केले असते, असे जरांगे म्हणाले.
मराठ्यांशिवाय या राज्यात कोणीही सत्तेवर बसू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाची बेईमानी करायची नाही. नाही तर तुमच्या मुंडक्यावर बसलोच समजा. सामूहिक आमरण उपोषण सुरू करू. तिन्ही गॅजेट्स सह कुणबी आणि मराठा एकच आहे. या मागण्या मान्य केल्याच पाहिजे. नाही तर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाला बसणार आहे.
हे आता सामूहिक आमरण उपोषण आहे. एकाच दिवशी एकाच वेळी अंतरवाली सराटी मध्ये सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. पुन्हा एकदा संपूर्ण मराठ्यांनी एकजूट दाखविण्यासाठी तयारीला लागा. तारीख मी जाहीर करणार आहे. त्यामुळे सर्वांनी अंतरवालीकडे यायचं आहे, असे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले. हे आमरण उपोषण अंतरवाली सराटीमध्येच होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.