Published on
:
24 Nov 2024, 7:41 am
Updated on
:
24 Nov 2024, 7:41 am
महाड : श्रीकृष्ण द.बाळ
जोपर्यंत विजयश्री खेचून आणत नाही, तोपर्यंत ही सुरू असलेली लढाई संपलेली नसल्याचे प्रतिपादन महाविकास आघाडीच्या नेत्या स्नेहल जगताप यांनी काल झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकाला पश्चात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना केले. निवडणुकीतील झालेल्या पराभवाने कार्यकर्त्यांनी खचून जाऊ नये व आजपासूनच पाच वर्षानंतर येणाऱ्या निवडणुकीसाठी सज्ज व्हावे असे आवाहन केले.
विधानसभेच्या निवडणुकीत स्नेहल जगताप यांचा झालेला पराभव हा कार्यकर्त्यांना धक्कादायक ठरल्याचे महाडमध्ये सर्वत्र दिसून येत होते. सायंकाळी उशिरा शेकडो समर्थकांनी कॅप्टन निवास येथे जाऊन नानासाहेब जगताप व स्नेहल जगताप यांची भेट घेतली. या प्रसंगी महाविकास आघाडीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना व सहकारी पदाधिकाऱ्यां समोर स्नेहल जगताप यांनी या निवडणुकीदरम्यान दोन महिन्यापासून महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या अथक प्रयत्नाबद्दल त्यांना धन्यवाद दिले. आपली लढाई ही सोपी नव्हती हे माहीत असूनही महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व शिवसैनिकांनी या लढाईमध्ये तन- मन- धन हरपून सर्वस्व दिल्या कारणानेच आपण 91 हजार मतांपर्यंत पोहोचू शकलो असे स्पष्ट करून झालेल्या पराभवाची कारणमीमांसा करून पुढील विजयासाठी सर्वांनी सिद्ध होण्याचे आवाहन त्यांनी केले.
आपल्या प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत अनेक अडचणींना सामोरे जावे लागले, मात्र तरीसुद्धा कार्यकर्त्यांनी एकजुटीने दिलेला लढा हा पुढील काळासाठी सर्वांना ताकद व प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास व्यक्त करून कार्यकर्त्यांनी या पराजयामुळे खचून जाऊ नये असे मत व्यक्त केले.