Published on
:
28 Nov 2024, 2:02 am
Updated on
:
28 Nov 2024, 2:02 am
कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात दिवसागणीक थंडीचा कडाका वाढू लागला आहे. यंदाच्या हिवाळ्यात कोल्हापुरातील किमान तापमान पहिल्यांदाच 15.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. तापमानातील घट आणि बोचरे वारे यामुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा एक ते दोन अंश कमी तापमान जाणवत असल्याने कोल्हापूर गारठले आहे. सायंकाळनंतरच शहरात हुडहुडी भरवणार्या थंडीची अनुभूती येत आहे, यामुळे ठिकठिकाणी शेकोटी पेटू लागल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. सात दिवसांपूर्वी 18 अंशांवर असलेले किमान तापमान आता 15 अंशांपर्यंत खाली आले आहे. यामुळे सायंकाळी सहा वाजल्यापासूनच हुडहुडी भरविणार्या थंडीचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे. मंगळवारपासून सायंकाळनंतर थंडीची तीव—ता वाढली आहे. काही काळ तर हुडहुडी भरावी, अशी थंडी होती. यामुळे संध्याकाळनंतर स्वेटर, कानटोप्या असे उबदार कपडे घालूनच नागरिक घराबाहेर पडत होते.
ग्रामीण भागातही थंडीचा जोर चांगलाच वाढला आहे. ग्रामीण भागातील किमान तापमान शहराच्या तुलनेत घसरल्याचे चित्र आहे. यामुळे थंडीचा जोरदार कडाका ग्रामीण भागात जाणवत आहे. विशेषतः आजरा, चंदगड, राधानगरी, पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा भागात थंडीची तीव—ता अधिक आहे.
गेल्या सात दिवसांपासून कोल्हापुरात किमान तापमान 17 अंशांच्या घरात होते. यापूर्वी गुरुवारी (दि. 21) व सोमवारी (दि. 25) तापमान 16.7 अंशांपर्यंत खाली आले होते. बुधवारी दैनंदिन सरासरी किमान तापमानात 1.6 अंशाची घट होऊन पारा 15.5 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला. कमाल तापमानातही 1.6 अंशाची घट होऊन पारा 28.8 अंशांवर स्थिरावला होता. किमान व कमाल तापमानात झालेल्या घसरणीमुळे थंडीची तीव—ता जाणवत आहे. येत्या दोन दिवसांत पारा आणखी घसरण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.