नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरोधात बंड पुकारणाऱ्या काही जणांकडून पुन्हा घरवापसीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांकडून त्यापैकी काहींना सकारात्मक प्रतिसाद दिला जात असल्यामुळे निष्ठावान स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्यास सामूहिक राजीनामे देऊ, असा इशाराच या मंडळींनी पक्षश्रेष्ठींना दिला आहे.
विधानसभा निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या काहींनी थेट पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना आव्हान देत बंडखोरी केली होती. गणेश गिते, माजी सभागृह नेते दिनकर पाटील, केदा आहेर व जयश्री गरुड यांनी बंडाचा झेंडा उगारत निवडणूक लढविली, तर माजी नगरसेवक कमलेश बोडके, पल्लवी पाटील, इंदुमती नागरे, कामगार आघाडीचे विक्रम नागरे, अमोल पाटील यांनी बंडखोरांना मदत केली. त्यानंतरही मतदारांनी महायुतीला कौल दिला. राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. त्यामुळे आता बंडखोरांना घरवापसीचे वेध लागले असून, काहींनी पक्षाच्या नेत्यांकडे परत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मात्र ऐन निवडणुकीत पक्षाला अडचणीत आणणाऱ्या या बंडखोरांना पुन्हा पक्षात घेण्यास भाजपमधील निष्ठावंतांनी विरोध दर्शविला आहे. बुधवारी (दि. २७) शहरातील विविध समस्यांसंदर्भात शहराध्यक्ष प्रशांत जाधव व आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. स्थायी समितीचे माजी सभापती उद्धव निमसे, सभागृह नेते सतीश सोनवणे, ॲड. श्याम बडोदे, अरुण पवार, दिनकर आढाव, धनंजय माने, नाना शिलेदार आदी उपस्थित होते. या भेटीनंतर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष जाधव यांच्याशी बंडखोरांविषयी चर्चा केली. बंडखोरांना पुन्हा पक्षात घेतल्यास सामूहिक राजीनामे दिले जातील, असा इशाराच यावेळी देण्यात आला.
बंडखोरी करून भाजपच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करणाऱ्यांना पक्षात घेण्यास आपला विरोध आहे. तसे झाल्यास माझा पहिला राजीनामा असेल.
- ॲड. राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व.
पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी व्यक्त केलेल्या भावना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू. पक्षाचे नुकसान होईल व ज्यांनी प्रामाणिक काम केले त्यांना नाराज होऊ देणार नाही.
-प्रशांत जाधव, शहराध्यक्ष, भाजप.