तिघांपैकी कुणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.file
Published on
:
28 Nov 2024, 4:19 am
Updated on
:
28 Nov 2024, 4:19 am
नाशिक : एकीकडे राज्याच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठीही चढाओढ सुरू झाली आहे. पालकमंत्री पदासाठी दादा भुसे, छगन भुजबळ, गिरीश महाजन यांच्यात रस्सीखेच असून, या तिघांपैकी कुणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २०२७ मध्ये नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या माध्यमातून हजारो कोटींची विकासकामे नाशिक शहरात होणार असून, जागतिक पातळीवर नाशिकचे नाव चर्चिले जाणार असल्याने नाशिकच्या पालकमंत्री पदाला महत्त्व आले आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले. विरोधक महाविकास आघाडीला सत्ता तर सोडाच पण, विरोधी पक्षनेता निवडीसाठी आवश्यक आमदारसंख्येचा आकडाही गाठता आलेला नाही. नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी १४ जागा महायुतीने लढविल्या आणि या सर्वच १४ जागांवर विजयही मिळविला. मालेगाव मध्य मतदारसंघाची एक जागा 'एमआयएम'ने राखली. महाविकास आघाडीचा जिल्ह्यात पुरता सुपडा साफ झाला. निवडणूक निकालानंतर आता राज्यात महायुतीकडून सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदाची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याचबरोबर पालकमंत्री पदावरूनही आता चढाओढ सुरू झाली आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात छगन भुजबळ यांनी नाशिकचे पालकमंत्री भूषविले होते. २०१४ मध्ये फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची सूत्रे गेली. महाजन यांच्याच पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात गत सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन झाले होते. शिंदे सरकार सत्तेवर आल्यानंतर नाशिकच्या पालकमंत्री पदावरून भुसे आणि महाजन यांच्यात चढाओढ झाली होती. अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला व्हेटो वापरत भुसे यांच्याकडे नाशिकच्या पालकमंत्री पदाची सूत्रे दिली होती. आता पुन्हा एकदा नाशिकचा पालकमंत्री कोण होणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे दोन आमदार असतानाही दादा भुसे यांना मंत्रिपद देण्यात आले होते. मागील अडीच वर्षांत मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भुसे यांनी आपल्या कामाची मोहोर उमटविली आहे. त्यामुळे शिवसेनेलाच पालकमंत्रिपद मिळेल, असा विश्वास शिवसैनिक व्यक्त करत असतानाच भाजपचे महाजन समर्थक कुंभमेळा मंत्री आणि पालकमंत्री पदावर केलेल्या कामाची आठवण करून देत आहेत. त्यामुळे भुसे, भुजबळांबरोबरच महाजन यांचाही नाशिकच्या पालकमंत्री पदावर दावा कायम आहे.
नाशिक जिल्ह्यातील १५ पैकी सर्वाधिक सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने विजय मिळविला आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांचे पारडे जड असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे पालकमंत्री भुसे कायम राहणार की, भुजबळांच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार की, सिंहस्थासाठी महाजन यांना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.