थांबा, विचार करा मगच प्रतिसाद द्या!file photo
Published on
:
07 Feb 2025, 2:08 am
Updated on
:
07 Feb 2025, 2:08 am
पुणे: डिजिटल अरेस्ट, शेअर बाजारासह विविध गेमिंग टास्कमध्ये भरघोस प्राप्तीचे आश्वासन अशा विविध युक्ती वापरून घोटाळेबाज डिजिटल अर्थव्यवस्थेला हादरे देत आहेत. अशा घोटाळेबाजांना बळी पडू नये यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) मोहीम हाती घेतली आहे.
अनपेक्षित कॉल अथवा मेसेजला प्रतिसाद देण्यापूर्वी नागरिकांनी थांबावे, विचार करावा आणि मगच प्रतिसाद द्यावा, असे आवाहन एनपीसीआयचे रिस्क ऑफिसर विश्वनाथ कृष्णमूर्ती यांनी केले आहे.
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) भारतात डिजिटल व्यवहारांचा प्रमुख घटक बनला आहे. गत कॅलेंडर वर्षात (2024) झालेल्या एकूण उलाढालीत यूपीआयचा वाटा 83 टक्के आहे. जानेवारी 2025 मध्ये यूपीआयद्वारे तब्बल 16.99 अब्ज व्यवहार झाले आहेत. व्यवहार संख्या 39 टक्क्यांनी वाढली असून मूल्यामध्ये 28 टक्क्यांची वाढ झाली आहे.
तुमच्या नावावर आलेल्या पार्सलमध्ये ड्रग्ज अथवा इतर प्रतिबंधित वस्तू वा पदार्थ असल्याचे भासविले जाते. तर कधी नागरिकांच्या खात्यावर अमूक रक्कम जमा झाल्याचा मेसेज येतो. चुकून पैसे पाठविल्याचे सांगून समोरच्या व्यक्तीला जाळ्यात ओढले जाते. अशा प्रकारच्या घटनांना प्रतिसाद देण्यापूर्वी यूपीआय वापरकर्त्यांनी ’स्टॉप, थिंक, अॅक्ट’ तत्त्वाचा वापर करावा. अर्थात तातडीने निर्णय घेण्यापूर्वी थांबून विचार करावा.
नागरिकांनी हे कृपया टाळावे....
अधिकृत स्रोतांकडून उदा. कंपनीची वेबसाइट किंवा ग्राहक सेवा हेल्पलाइनचा वापर करून आलेली रिक्वेस्ट पडताळून घ्यावी.कोणत्याही प्रकारच्या संशयास्पद रिक्वेस्ट्स टाळाव्यात. अनपेक्षित क्रमांकावरून आलेल्या एपीके फाईल्सवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, शक्यतो अशा फाईल्स टाळाव्यात.
इथे द्या फसवणुकीची माहिती...
फसवणुकीचा संशय आल्यास संबंधित प्रकरणाची माहिती नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइनकडे 1930 या क्रमांकावर अथवा https:///cybercrime. gov. in द्यावी.
एआयचाही होऊ शकतो वापर...
घोटाळेबाज कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) टूल वापरून फसवणूक करू शकतात. अगदी आपल्या परिचिताचा कॉल भासवून पैशांची मागणी केली जाऊ शकते. त्यामुळे तातडीने प्रतिसाद देण्याऐवजी पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्यावा.