साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसर्याच्या मुहूर्तावर पुणेकरांनी यंदा तब्बल 7 हजार 404 वाहनांची खरेदी केली आहे. यात सर्वाधिक 4 हजार 957 दुचाकी, तर 1 हजार 796 चारचाकींची खरेदी केल्याची नोंद पुणे आरटीओ कार्यालयात करण्यात आली आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक वाहने खरेदीला चांगला प्रतिसाद असून, तब्बल 202 इलेक्ट्रिक दुचाकींची रस्त्यावर भर पडणार आहे.
दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर पुणेकर वाहन खरेदीला नेहमीच मोठी पसंती देतात. विजयादशमीला पूजा करून अनेकांनी वाहने घरी नेण्याची जय्यत तयारी केली आहे.
काहींनी शोरूममध्ये आपल्या आवडीच्या वाहनांचे बुकिंग करून ठेवले आहे. वाहन नोंदणी वेळेत व्हावी, याकरिता पुणे आरटीओ कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी गतीने काम करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.