हॅरी ब्रूक बनला ‘मुलतान’चा नवा ‘सुलतान’! सेहवागचा विक्रम काढला मोडीत

2 hours ago 1
रणजित गायकवाड

Published on

10 Oct 2024, 11:00 am

Updated on

10 Oct 2024, 11:00 am

पुढारी ऑनलाईन डेस्क : Harry Brook Triple Century : इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने पाकिस्तानविरुद्धच्या मुलतान कसोटीत त्रिशतक झळकावून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे त्याने हे त्रिशतक अवघ्या 310 चेंडूत पूर्ण केले. त्याचे त्रिशतक हे कोणत्याही इंग्लिश फलंदाजाने झळकावलेले सर्वात जलद त्रिशतक ठरले आहे. यासह ब्रूक कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान त्रिशतक झळकावणारा गेल्या 34 वर्षांतील पहिला इंग्लिश क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचे हे कारकिर्दीतील पहिलेच त्रिशतक आहे. त्याने 317 धावांची खेळी खेळली. यासह त्याने नवा विक्रम रचला. तसेच तो ‘मुलतान’चा नवा ‘सुलतान’ बनला. त्याने वीरेंद्र सेहवागचा मुलतान स्टेडियमवरील महान विक्रम मोडीत काढला.

ब्रुकने सेहवागचा विक्रम मोडला

2004 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या टीम इंडियासाठी मुलतानमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत वीरेंद्र सेहवागने चांगलीच चमक दाखवली. त्या कसोटीत सेहवागने टीम इंडियासाठी 309 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याने अवघ्या 364 चेंडूत आपले त्रिशतक पूर्ण केले. आपल्या तिहेरी शतकी खेळीत त्याने 39 चौकार आणि 6 षटकार मारून पाकिस्तानी गोलंदाजीची पिसे काढली होती. दुसरीकडे, मुलतानमध्ये सर्वात वेगवान त्रिशतक झळकावण्यासाठी हॅरी ब्रूकने केवळ 310 चेंडू घेतले. तो बाद झाला तेव्हा त्याने 322 चेंडूंत 29 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 317 धावा केल्या होत्या. यासह तो मुलतानच्या मैदानावर सर्वात मोठी खेळी खेळणारा खेळाडूही ठरला आहे. सर्वात जलद त्रिशतक झळकावण्याच्या बाबतीत सेहवाग अजूनही अव्वल स्थानी आहे. त्याने 2007-08 मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध केवळ 278 चेंडूत त्रिशतक झळकावले होते.

त्रिशतक झळकावणारा सहावा खेळाडू

ब्रूकला पाकिस्तानच्या भूमीवर धावा करणे आवडते. त्याने येथे मागील मालिकेत 468 धावा केल्या होत्या. आता पुन्हा एकदा पाकिस्तानच्या मैदानावर त्याच्या बॅटमधून वादळी खेळी आली आहे. पहिल्याच कसोटीत त्याने 317 धावा (322 चेंडू) केल्या. पाकिस्तानच्या सपाट खेळपट्ट्यांचा फायदा कसा घ्यायचा याची त्याला चांगली जाण आहे. कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा तो सहावा इंग्लिश खेळाडू ठरला आहे. त्याच्या खेळीच्या जोरावर इंग्लंडने पाकिस्तानविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावसंख्येचा नवा विक्रमही रचला.

पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा पाचवा फलंदाज

पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक झळकावणारा हॅरी हा जगातील 5वा फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स यांनी1958 मध्ये 365 धावांची नाबाद खेळी केली होती, तर 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरने 335 धावांची नाबाद खेळी केली होती. ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने 1998 मध्ये पेशावर कसोटीत नाबाद 324 धावा केल्या होत्या, तर भारताच्या वीरेंद्र सेहवागने मुलतानच्या मैदानात 309 धावा केल्या होत्या.

रूटसोबत ऐतिहासिक भागीदारी

ब्रूक आणि जो रूट यांनी मिळून 454 धावांची भागीदारी केली. कोणत्याही कसोटीत पाकिस्तानविरुद्ध केलेली ही सर्वात मोठी भागीदारी आहे. या जोडीने पीटर मे आणि कॉलिन काउड्री यांचा 67 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ज्यांनी 411 धावांची भागीदारी केली होती. रुट 262 धावांची उत्कृष्ट खेळी खेळून बाद झाला. त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे द्विशतक झळकावले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article