दिवसा वीज वापरल्यास मिळणार अधिक सवलत; महावितरणचा प्रस्तावPudhari File Photo
Published on
:
31 Jan 2025, 2:41 am
Updated on
:
31 Jan 2025, 2:41 am
पुणे: महावितरणने महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाखल केलेल्या वीज दर याचिकेमध्ये घरगुती ग्राहकांसाठीच्या वीज दरात टप्प्याटप्प्याने कपात करण्यास परवानगी मागतानाच त्यांना दिवसा वीज वापरल्यास अधिक सवलत देण्याचेही प्रस्तावित केले आहे, अशी माहिती महावितरणमधील सूत्रांनी दिली. जे घरगुती ग्राहक दिवसा वीज वापरतील त्यांना प्रत्येक युनिटमागे 80 पैसे ते एक रुपया सवलत देण्याचा प्रस्ताव मांडणेही महावितरणला शक्य झाले आहे, असे सांगण्यात आले.
महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेल्या प्रस्तावानुसार, घरगुती ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेतील वीज वापरासाठीच्या दरात सवलत देण्यात येईल. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये प्रतियुनिट 80 पैसे, 2026-27 मध्ये 85 पैसे, 2027-28 मध्ये 90 पैसे, 2028-29 मध्ये 95 पैसे आणि 2029-30 या वर्षात एक रुपया सवलत देण्यात येईल.
आयोगाने मान्यता दिल्यानंतर दि. 1 एप्रिलपासून ही सवलत सुरू होऊ शकते. कोणत्या वेळी वीज वापरली, त्यानुसार विजेच्या दरात सवलत देण्यास तांत्रिक भाषेत ‘टीओडी’ (टाईम ऑफ डे) म्हणतात. ही सुविधा आतापर्यंत फक्त उद्योगांना होती; पण आता ती उद्योगधंद्यांसोबतच घरगुती ग्राहकांनाही देण्यात येणार आहे.
‘टीओडी’ मीटर मोफत मिळणार
‘टीओडी’ (टाईम ऑफ डे) सुविधा मिळण्यासाठी वीज ग्राहकाने कोणत्या वेळेला विजेचा वापर केला, हे समजणे आवश्यक आहे. घरगुती ग्राहकांकडे सध्या बसविलेल्या मीटरमध्ये ‘टीओडी’ची सुविधा नाही. तथापि, घरगुती ग्राहकांना ‘टीओडी’ सवलतीचा लाभ घेता यावा, यासाठी महावितरणकडून त्यांना मोफत ‘टीओडी’ मीटर बसवून देण्यात येणार आहेत, असे सांगण्यात आले.