दिव्यांगाच्या प्रस्तावावर स्वाक्षरीसाठी 1 हजाराच्या लाचेची मागणी:फाळेगावच्या तलाठ्यावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

3 days ago 2
राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेच्या प्रस्तावावर स्वाक्षरी व शिक्का देण्यासाठी १ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या फाळेगाव (ता. हिंगोली) येथील तलाठी माधव भालेराव याच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी ता. १९ गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत माहिती अशी की, या प्रकरणातील तक्रारदार यांचा नातेवाईक शंकर झनक पाटोळे हे ४० टक्के दिव्यांग आहेत. त्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेमध्ये अनुदान मिळण्यासाठी तक्रारदाराने शंकर यांचा प्रस्ताव तयार केला होता. सदर प्रस्तावावर स्वाक्षरीसाठी त्यांनी फाळेगाव तलाठी सज्जा कार्यालयात ता. १३ नोव्हेंबर रोजी दाखल केला. मात्र यावेळी तलाठी माधव भालेराव याने सदर प्रस्ताव स्वतःकडे ठेऊन प्रस्तावावर स्वाक्षरी व शिक्का देण्यासाठी १ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यावरून तक्रारदाराने हिंगोलीचया लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याबाबत पडताळणी केल्यानंतर ता. १४ नोव्हेंबर रोजी लाचलुचपतचे उपाधिक्षक विकास घनवट, पोलिस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकूशकर, कर्मचारी शेख युनूस, विजय शुक्ला, तानाजी मुंडे, ज्ञानेश्‍वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, गजानन पवार, शेख अकबर यांच्या पथकाने सापळा रचला होता. मात्र यावेळी तलाठी माधव भालेराव यास संशय आल्याने त्याने लाचेची रक्कम घेतली नाही. मात्र त्याने पंचा समक्ष लाच स्विकारण्यास सहमती दर्शविली होती. त्यामुळे लाच मागिल्याच्या आरोपावरून तलाठी भालेराव याच्या विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस निरीक्षक प्रफुल्ल अंकूशकर पुढील तपास करीत आहेत.

*** Disclaimer: This Article is auto-aggregated by a Rss Api Program and has not been created or edited by Nandigram Times

(Note: This is an unedited and auto-generated story from Syndicated News Rss Api. News.nandigramtimes.com Staff may not have modified or edited the content body.

Please visit the Source Website that deserves the credit and responsibility for creating this content.)

Watch Live | Source Article