Published on
:
21 Jan 2025, 1:25 am
Updated on
:
21 Jan 2025, 1:25 am
खेड शहर : कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने कला प्रदर्शनाचे दरवर्षी आयोजन केले जाते. या प्रदर्शनासाठी व्यावसायिक या विभागामध्ये महाराष्ट्रातील अनेक चित्रकार व शिल्पकार यांचा सहभाग असतो. यावर्षी घेण्यात येत असलेल्या 64 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शनासाठी येथील श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे कला शिक्षक राकेश देवरुखकर यांच्या चित्राला राज्य शासनाचे पारितोषिक जाहीर झाले आहे. कला संचलनायाकडून नुकताच हा निकाल जाहीर करण्यात आला. राज्यातील 15 कलाकारांच्या कलाकृतींना राज्य पुरस्कार स्वरूपात पारितोषिक मिळाते. देवरुखकर यांना हा पुरस्कार तिसर्यांदा प्राप्त होत आहे. यापूर्वी सन 2017 व सन 2022 यावर्षी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
चित्रकलेसह विविध कला क्षेत्रात ते अग्रभागी दिसून येतात. देवरुखकर यांचे तैल रंगावर कमालीचे प्रभुत्व आहे. जल रंगाच्या विविध छटा त्यांना अवगत असून त्यांच्या माध्यमातून चित्रकलेचे शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी विविध संस्थासह विविध क्षेत्रात आपल्या कलेचा ठसा उमटवताना दिसून येतात. अनेक मान्यवरांकडे त्यांच्या चित्रांचा संग्रह आहे. कोकणचा निसर्ग त्यांनी आपल्या कुंचल्यातून सर्व दूर पोहोचवला आहे. कोकणचे ग्रामीण जीवन हा त्यांच्या चित्रांचा मुख्य विषय असतो.
यावर्षी निवड झालेल्या त्यांच्या चित्रात निसर्ग चित्र हा त्यांच्या चित्राचा विषय आहे. कलाकाराच्या नजरेतून रसिकांना न्याहाळता येणारे सौंदर्य हे अंतर्मुख करायला लावणारे असते. देवरुखकर यांच्या चित्रांचे विषय रसिकांना सहज आकलन होतील, असे असतात.
या वर्षीचे 64वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन मुंबई येथील प्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी येथे ता.4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता या पुरस्कार सोहळ्याचे वितरण मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
तसेच या चित्रांचे प्रदर्शन ता. 4 ते 10 फेब्रुवारी 2025 या सर्व कलाप्रेमींना पाहण्यासाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात देवरुखकर यांच्या कलाकृतीला कला संचालनालय महाराष्ट्र राज्य यांचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सहजीवन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हिराचंद बुटाला, संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेश बुटाला, श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल चे चेअरमन राजेश बुटाला, कोकणातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ चित्रकार शिल्पकार प्रकाश राजेशिर्के, सह्याद्री कला महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव, सहजीवन संस्थेचे सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी राकेश देवरुखकर यांचे अभिनंदन केले आहे.