Devendra Fadnavis connected Rahul Kool : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज दौंडमध्ये सभा झाली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांच्या मंत्रिपदाचे संकेत दिले आहेत. दौंडकरांना संबोधित करताना देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...
राहुल कुल, देवेंद्र फडणवीस Image Credit source: Facebook
विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्यातील दौंडमध्ये आहेत. दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार राहुल कुल यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची वरवंड गावात सभा झाली. या सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राहुल कुल यांच्या कामाचं कौतुक केलं. राहुल कुल यांच्या मंत्रिपदाचे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. दौंडच्या जनतेला संबोधित करताना तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला मंत्री देतो, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राहुल कुल यांच्या मंत्रिपदाचे संकेत
23 तारखेला राहुल कुल नवीन रेकॉर्ड करणार आहेत. कचा-कच बटन दाबून राहुल कुल कांचन कुल यांना लग्नाच्या वाढदिवसाचं गिफ्ट द्या. माझ्या मनामध्ये कोणतीही शंका नाही जुने सगळे रेकॉर्ड मोडणार आहेत. मी ठरवलं आहे. यावेळी राहुल कुल यांना मंत्री करणार आहे. पण माझी अट आहे. 20 हजार पेक्षा कमी मताधिक्याने निवडून दिलं तर राज्यमंत्रिपद देणार. 20 हजार पेक्षा जास्त मताधिक्य दिले तर कॅबिनेट मंत्री देणार आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.