फातिमा बोथरेpudhari photo
Published on
:
16 Nov 2024, 12:45 am
Updated on
:
16 Nov 2024, 12:45 am
कणकवली ः कणकवली बसस्थानकाच्या फलाटावर लागलेली एक बस मार्गस्थ होण्यासाठी चालक मागे घेत असताना त्याचवेळी त्या फलाटानजिक दुसरी बस लागत असताना फातिमा रियाज बोथरे (36, रा. उंबर्डे मेहबूबनगर) या महिलेला बसची धडक बसून ती गंभीररित्या जखमी झाली. तिला उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात नेले असता तत्पूर्वीच तिचे निधन झाले.
ही घटना शुक्रवारी सकाळी 10.15 वा. च्या सुमारास घडली.घटनेनंतर मयत महिलेच्या नातेवाईकांसह कणकवलीतील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुपारी बसस्थानकावरच ठिय्या धरत दोषी चालक वाहकांवर कारवाई करा, मयत महिलेच्या वारसांना तात्काळ 5 लाखाची मदत देण्याची मागणी करत संपूर्ण वाहतूक रोखून धरली. विभाग नियंत्रकांसह संबंधित अधिकार्यांना जाब विचारत सुमारे अडीज तास हे आंदोलन करण्यात आले. अखेर विभाग नियंत्रक श्री. घुले यांनी 5 लाखाची रक्कम नातेवाईकांना दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.
हरकुळ बुद्रुक येथील शेख कुटुंबातील माहेर असलेल्या फातिमा बोथरे यांचा विवाह 10 वर्षापूर्वी झाला होता. त्यांचे सासर वैभववाडी तालुक्यातील उंबर्डे-मेहबुबनगर येथे आहे. शुक्रवारी सकाळी त्या काही कामानिमित्त आपल्या सासू नुरजहाँ बोथरे (70) घेवून ओरोसला निघाल्या होत्या. शुक्रवारी सकाळी 10.15 वा. च्या सुमारास त्या वैभववाडी येथून कणकवली बसस्थानकावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांचे भाऊ अन्वर शेख हे बहिणीला भेटण्यासाठी बसस्थानकावर आले होते. ते फलाट क्रमांक 4-5 च्या समोर उभे होते तर फातिमा व त्यांची सासू फलाट क्रमांक 4-5 च्या पुढे स्टॅण्डच्यासमोर जात असताना फलाट क्रमांक 5 वर उभ्या असलेल्या फोंडा-कणकवली या बसचा चालक बस मागे घेत होता. मात्र त्यावेळी या बसचा कंडक्टर खाली उतरला नव्हता. हि बस मागे घेत असताना फातिमा यांची सासू हि स्टॅण्डच्या दिशेने मागे आली तर फातिमा हि चालत पुढे जात असताना त्याचवेळी कणकवली-सावंतवाडी हि बस भरधाव वेगात फलाट क्रमांक 4 वर लावण्यासाठी चालक घेवून आला.
त्याही बसचा कंडक्टर त्यावेळी खाली उतरला नव्हता. त्यामुळे दोन्ही बसच्या चालकांनी फातिमा या फलाट क्रमांक 4-5च्या समोर चालत आहेत याकडे दुर्लक्ष करत गाड्या मार्गस्थ करताना एकमेकांवर धडकवल्या. त्यात फोंडा-कणकवली या एसटी बसची डाव्या बाजूच्या पुढील चाकाजवळ फातिमा यांना धडक बसून त्या जमिनीवर पडल्या त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले होते.
नातेवाईकांसह सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आक्रमक ः बसस्थानकावर ठिय्या आंदोलन
या घटनेची माहिती फातिमा बोथरे यांच्या कुटुंबीयांना मिळाल्यानंतर त्यांनी लगेच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. बस चालकांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाला असल्याने त्या महिलेच्या नातेवाईकांनी व समाज बांधवांनी कणकवली बसस्थानकात धाव घेऊन जोपर्यंत नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत स्थानकातून एकही बस जाऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली.
या अपघाताची माहिती लोकप्रतिनिधींना मिळताच ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, माजी जि.प. अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, नवाज खानी, सोनू सावंत, राजू पेडणेकर, इम्रान शेख आदींनी कणकवली बस स्थानकात धाव घेतली.
दरम्यान दोन एसटीच्या चालक वाहकाना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यावेळी संतप्त झालेल्या त्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी एसटीच्या जबाबदार अधिकार्यांना घटनास्थळी बोलवा मगच बोला, असा इशारा दिला. मात्र यावेळी वाहतूक नियंत्रक श्री. परब हे आगारात उपस्थित नव्हते. यावेळी विभाग नियंत्रकांना घटनास्थळी बोलवा असे सांगितले असता वाहतूक नियंत्रकांनी घटनास्थळी येण्यास टाळाटाळ केली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी व लोकप्रतिनिधींनी संतप्त होत जोपर्यंत विभाग नियंत्रक बसस्थानकावर येत नाहीत तो पर्यंत एकही बस स्थानकाबाहेर जाऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. यादरम्यान एसटीच्या अधिकार्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. तेव्हा सीसीटीव्ही कॅमेरे तपासा तसेच सीसीटीव्ही फुटेज दाखवा, अशी मागणी करण्यात आली. तेव्हा सीसीटीव्ही बंद असल्याचे प्रभारी आगार व्यवस्थापक श्री. यादव यांनी सांगितले.
यावेळी उपविभागीय पोलिस अधिकरी घनश्याम आढाव, पोलिस निरीक्षक मारुती जगताप, पोलिस उपनिरीक्षक राजकुमार मुंढे, कॉन्स्टेबल किरण मेथे, वाहतुक पोलिस हवालदार आर.के.पाटील, विनोद चव्हाण, मंगेश बावधाने आदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तसेच होमगार्ड पथक तैनात करण्यात आले होते.
दरम्यान विभाग नियंत्रक श्री. घुले, विभागीय वाहतूक अधिकारी श्री. देशमुख हेही बसस्थानकावर दाखल झाले. त्यांना सर्वांनीच धारेवर धरत जाब विचारला. यावेळी मृत महिलेच्या वारसांना 5 लाखाची तात्काळ मदत द्या, दोषी असलेल्या दोन्ही गाड्यांच्या वाहन चालकांना निलंबित करा, तसेच दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. दुपारी 11.30 वा. नंतर 2 वा. पर्यंत सुमारे अडीज तास हे आंदोलन सुरू होते. त्यामुळे यादरम्यान एकही बस आगारातून सुटू शकली नाही. आंदोलनादरम्यान कोणीतरी एका बसवर दगड मारला मात्र कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
अखेर दुपारी 2 वा. च्या सुमारास विभाग नियंत्रकांनी 5 लाखाची मदत मृत महिलेच्या वारसांना रोख स्वरुपात दिली. मात्र एसटी महामंडळाकडून दिली जाणारी विम्याची 10 लाखाची मदत व अन्य भरपाईही लवकरात लवकर मृताच्या वारसांना मिळायला हवी अशी मागणी संदेश पारकर, संदेश सावंत यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी केली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक हे देखील उपस्थित होते.
दरम्यान पत्रकारांशी बोलताना संदेश पारकर यांनी एसटी अधिकार्यांच्या बेजबाबदार आणि निष्काळजीपणामुळे हि घटना घडली असून दोषी कर्मचार्यांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. मृत महिलेच्या वारसांना एसटी महामंडळाकडून लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे. यासाठी आम्ही सर्वजण त्या महिलेच्या कुटुंबियांच्या पाठिशी असल्याचे सांगितले. तर संदेश सावंत यांनीही मृत महिलेच्या कुटुंबियांना उर्वरित मदत लवकरात लवकर महामंडळाकडून मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, अशी ग्वाही दिली.
दोन्ही बसच्या चालक -वाहकांवर गुन्हे दाखल
या अपघातप्रकरणी फोंडा-कणकवली या बसचा चालक सचिन केशव सापळे (36), वाहक राजन मनोहर धुरी (47) तर कणकवली सावंतवाडी या बसचा चालक सत्यविजय जयवंत जाधव (38), वाहक लक्ष्मण रघुनाथ चव्हाण (57, सर्व कणकवली बस डेपो) यांच्यावर कणकवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. याबाबतची फिर्याद मृत झालेल्या फातिमा बोथरे यांचे भाऊ अन्वर शेख (मुळ रा. हरकुळ बु., सध्या रा. वरवडे) यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली.