Published on
:
02 Feb 2025, 12:17 pm
Updated on
:
02 Feb 2025, 12:17 pm
पुढारी ऑनलाईन डेस्क : महिला डॉक्टरवरील बलात्कार-हत्या प्रकरणानंतर देशभरात चर्चेत आलेले कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमध्ये एका एमबीबीएसच्या विद्यार्थिनीने जीवन संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे आरजी कार हॉस्पिटल पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
आयव्ही प्रसाद ही २० वर्षीय एमबीबीएसची विद्यार्थिनी कामरहाटी ईएसआय हॉस्पिटलच्या क्वार्टरमध्ये राहत हाेती. या हॉस्पिटलमध्ये तिची आई डॉक्टर म्हणून काम करते. तर वडील मुंबईत एका राष्ट्रीयकृत बँकेत वरिष्ठ अधिकारी आहेत. तिने गळफास घेवून जीवन संपवले.
या प्रकरणी कोलकाता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयव्ही प्रसाद घरात एकटी होती. वारंवार फोन करूनही, तिच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर तिच्या आईने घराचा दरवाजा तोडला. यावेळी तिने गळफास घेतला असल्याचे निदर्शनास आले. तिला तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले, येथे तिला मृत घोषित करण्यात आले. तिने कोणत्या कारणासाठी जीवन संपवले हे स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी मृत्यूपूर्वी तिने लिहिलेली चिठ्ठीही सापडलेली नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.