आक्रोश करताना कुटुंबिय.
Published on
:
02 Feb 2025, 2:21 pm
Updated on
:
02 Feb 2025, 2:21 pm
गोंदिया : अर्जुनी-मोर तालुक्यातील अरततोंडी / दाभणा येथील दोन चुलत भावांचा गावाशेजारील तलावात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.२) दुपारी चारच्या सुमारास उघडकिस आली. रितीक रुपराम पातोळे (वय १३), दुर्गेश धनंजय पातोळे (वय १३, दोघेही रा.अरततोंडी) अशी मृत चुलत भावांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, तालुक्यातील अरततोंडी / दाभणा येथील रितीक व दुर्गेश हे दोघे चुलत भाऊ जिल्हा परिषद शाळेत सातवीच्या वर्गात शिकतात. रविवारी सुट्टी असल्याने ते दोघे ते पिंपळगाव- अरततोंडी मार्गावर अगदी अरततोंडी गावाला लागूनच असलेल्या तलावात दोघे लहान गोरे ( बैल ) धुवायला गेले होते. यादरम्यान दोघेही पोहायला पाण्यात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून मृत्यू झाला. घटनास्थळी गावकऱ्यांनी तलावाजवळ मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच अर्जुनी मोरगाव पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कमलेश सोनटक्के आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर दोन्ही मुलांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी अर्जुनी मोरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. दोन्ही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे.