६७ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा निकाल लागला आहे. यंदा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ ठरला आहे. अंतिम सामन्यात मेहेंद्र गायकवाड याने मैदान सोडल्याने अखेर पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ हा ६७ वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. दरम्यान या स्पर्धेला गालबोट देखील लागले आहे. उपात्य फेरीच्या सामन्यात शिवराज राक्षे या पंचांनी पराभूत घोषीत केल्याने चिडलेल्या शिवराज राक्षे यांनी पंचांना लाथ मारल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पंचांनी आक्रमक भूमिका घेत जोपर्यंत शिवराज राक्षे याच्यावर कारवाई करीत नाही तोपर्यंत मैदान न सोडण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शिवराजच्या आईने आपला मुलगा खोटे बोलणार नाही असा दावा करीत मुलाची बाजू घेतली आहे.
अहिल्यानगर येथे यंदाची ६७ महाराष्ट्र केसरी कुस्तीस्पर्धा भरविण्यात आली होती. उपात्य फेरीत पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ आणि नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे दोघांचा सामना सायंकाळी सात वाजता सुरु झाला. यावेळी पंचांनी चुकीचा निकाल दिल्याचा आरोप करीत पैलवान शिवराज राक्षे यांनी पंचांना लाथ मारली. त्यानंतर त्यांची कॉलर देखील पकडल्याने अभूतपूर्व गोंधळ उडाला, अखेर पोलिसांना हस्तक्षेप करुन हे भांडण मिटवावे लागले. आपण पाठ किंवा खांदे टेकलेले नव्हते असे शिवराज राक्षे यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आता राक्षे यांचे पालकांनी मुलाची बाजू घेतली आहे.
आपला मुलगा खोटं बोलणारा नाही, त्याची पाठ टेकली असती तर त्याने कबूल केले असते. पंचानीच निर्णय चुकीचा दिला आहे. त्यांनी कुस्तीचा रिव्हयू दाखवायला हवा,कुस्ती झाली का नाही हे समाजाने पाहिले आहे, त्याने कॉलर पकडली लाथ मारली आपण पाहिले नाही, आपण त्यावर काय बोलू शकतो, मागच्या वेळेस सुद्धा असेच झाले. सिकंदरच्या वेळेस सुद्धा चुकीचा निर्णय दिला गेला. तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार म्हणून आनंद झाला होता.आम्ही कष्ट करून शिवराजला घडवलं आहे असे शिवराजचे पालकांनी म्हटले आहे.
दुसरीकडे जोपर्यंत शिवराज राक्षे याच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आखाड्यावरून उठणार नाही असा निर्णय पंचांनी घेतला आहे. राक्षे याने पंचाला लाथ मारल्यामुळे सर्व पंचानी हा निर्णय घेतला आहे. तर अहिल्यानगर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष तथा आमदार संग्राम जगताप यांच्याशी चर्चा केल्याशिवाय आपण येथून हलणार नसल्याची भूमिका पंचांनी घेतली आहे. त्यांनी मीडियाशी बोलण्यास देखील नकार दिला आहे. अंतिम सामान्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याने मैदान सोडल्याने पृथ्वीराज मोहोळ हा यंदाचा महाराष्ट्र केसरी ठरला आहे.