भारताने पाचव्या टी-20 सामन्यात इंग्लंडवर 150 धावांनी मोठा विजय नोंदवला आहे.
Published on
:
02 Feb 2025, 7:21 pm
Updated on
:
02 Feb 2025, 7:21 pm
मुंबई : अभिषेक शर्माच्या शतकाच्या जोरावर भारताने पाचव्या टी-20 सामन्यात इंग्लंडवर 150 धावांनी मोठा विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माने या सामन्यात 135 धावांची धुवाँधार खेळी केली. अभिषेक शर्मा फक्त शतक झळकावून थांबला नाही तर त्याने एकाच षटकात 2 विकेटस् घेत विक्रम केला आहे, तर मोहम्मद शमीने 3 विकेटस् घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणक्यात पुनरागमन केले. भारताने दिलेल्या 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना अवघ्या 97 धावांवर सर्वबाद झाला. भारताकडून एकट्या अभिषेक शर्माने 135 धावांची वादळी खेळी केली. इंग्लंडचे 11 खेळाडू मिळूनही अभिषेकच्या 135 धावांचा टप्पा गाठू शकले नाहीत. मालिका आधीच काबीज केलेल्या टीम इंडियाने शेवटच्या सामन्यात इंग्लंडचा एकतर्फी 150 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. इंग्लंडचा धावांच्या बाबतीत हा सर्वात वाईट पराभव आहे. पाच सामन्यांची मालिका भारताने 4-1 अशी आपल्या नावावर केली.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारताने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला आणि पहिल्याच चेंडूपासून तुफानी फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. संजू सॅमसनने पहिल्याच षटकात 16 धावा केल्या, पण पुढच्याच षटकात तो बाद झाला. मात्र अभिषेक शर्माने दुसर्या बाजूने आक्रमण सुरूच ठेवत आपली तुफानी फटकेबाजी सुरूच ठेवली.
अभिषेकने विशेषत: जोफ्रा आर्चर आणि जेमी ओव्हरटन यांच्याविरुद्ध जोरदार फटकेबाजी केली आणि पॉवरप्लेमध्ये अवघ्या 17 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. या फॉरमॅटमध्ये भारताचे हे दुसरे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. टीम इंडियाने पहिल्या 6 षटकांत 95 धावा केल्या होत्या. अभिषेकची वादळी फलंदाजी सुरूच होती आणि त्याने 11 व्या षटकात 37 चेंडूंत शतक पूर्ण केले. रोहित शर्मानंतर अभिषेक शर्माने भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. 18 व्या षटकात बाद होण्यापूर्वी अभिषेकने केवळ 54 चेंडूंत 135 धावा केल्या, ज्यात 13 षटकार आणि 7 चौकारांचा समावेश आहे. त्याच्याशिवाय शिवम दुबे आणि तिलक वर्मा यांनीही लहान पण वेगवान खेळी खेळल्या. इंग्लंडकडून ब्रेडन कार्सने 3 विकेटस् घेतल्या.
इंग्लंडने 248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली आणि पहिल्याच षटकात फिल सॉल्टने मोहम्मद शमीविरुद्ध 2 चौकार आणि 1 षटकारासह वादळी सुरुवात केली, पण त्याला दुसर्या टोकावरून चांगली साथ मिळाली नाही. तिसर्या षटकात बेन डकेटला शमीने पहिल्याच चेंडूवर माघारी धाडले, तर पाचव्या षटकातच कर्णधार जोस बटलरला वरुण चक्रवर्तीने बाद केले. सॉल्ट दुसर्या बाजूने फटकेबाजी करत होताच आणि त्याने 21 चेंडूंत अर्धशतकही ठोकले, पण बाकीचे फलंदाज वरुण आणि रवी बिष्णोईपुढे शरणागती पत्करताना दिसले.
त्यानंतर 8 व्या षटकात शिवम दुबेने सॉल्टला (55) बाद करून इंग्लंडच्या आशा धुळीस मिळवल्या. यानंतर अभिषेकने एकाच षटकात दोन विकेटस् घेत इंग्लंडच्या पराभवावर शिक्कामोर्तब केला, यानंतर शमीने 11व्या षटकात सलग दोन विकेटस् घेत इंग्लंडला पराभूत केले. टीम इंडियाकडून शमीने सर्वाधिक 3 विकेटस् घेतले, तर दुबे, अभिषेक आणि वरुणने प्रत्येकी 2 विकेटस् घेतले. अशा प्रकारे टीम इंडियाने मालिका 4-1 ने आपल्या नावे केली आहे.
भारत : 20 षटकांत 9 बाद 247 धावा. (अभिषेक शर्मा 135, शिवम दुबे 30. ब्रायडन कार्स 3/38.)
इंग्लंड : 10.3 षटकांत सर्वबाद 97 धावा. (फिल सॉल्ट 55, जेकब बेथेल 10. मो. शमी 3/25, अभिषेक शर्मा 3/2)