हळदी ः पलटी झालेली खासगी आराम बस.
Published on
:
02 Feb 2025, 8:51 pm
Updated on
:
02 Feb 2025, 8:51 pm
देवाळे : गोव्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी खासगी आराम बस कांडगाव (ता. करवीर) जवळ शेरीच्या माळाच्या वळणावर पलटी झाली. या अपघातात एक ठार तर 30 हून अधिक प्रवाशी जखमी झाले. अमोल परशुराम भिसे (रा. छत्रपती संभाजीनगर) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. रविवारी रात्री उशिरा अपघात झाला. जखमींना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
गोव्याहून छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी बस (क्रमांक डीडी 01 टी 9333) सायंकाळी निघाली होती. छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी कंपनीतील सुमारे 143 कर्मचारी 30 जानेवारी रोजी खासगी आराम बसमधून सहलीला गोव्यासाठी गेले होते. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास त्यांनी कणकवली येथे जेवण केले. भरधाव वेगात असणारी ही बस कांडगाव येथील वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे पलटी झाली. बसमध्ये 39 प्रवासी होते. अडकलेल्या प्रवाशांना काढण्यासाठी रात्री उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते. आवाजाने गावातील लोक जमा झाले. घटनेची माहिती पोलिस दाखल झाले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. अंधारामुळे मदतकार्यात अडथळे निर्माण होत होते.