Published on
:
02 Feb 2025, 11:36 pm
Updated on
:
02 Feb 2025, 11:36 pm
दमास्कस : सीरियन वाळवंटाच्या एका कोपर्यात, कतानी राजमहालाचे अवशेष एका तलावाच्या काठावर पडले आहेत. हा तलाव बर्याच काळापासून कोरडा पडला आहे. 2002 मध्ये पुरातत्त्वशास्त्रज्ञ इथे एका शाही कबरीचा शोध घेत होते, तेव्हा त्यांना हे अवशेष सापडले. एका खोल बोगद्याच्या सुरुवातीला एक बंद फाटक होते. या फाटकाच्या आत सोन्या-नाण्याचा खजिना होता. यात दोन हजार वस्तू आणि एक सोन्याचा हातदेखील होता. या ठिकाणी बरेच डाग होते. जेव्हा प्रयोगशाळेत या डागांचे नमुने तपासले, तेव्हा एक विशिष्ट जांभळा थर दिसून आला. या संशोधकांनी नकळत प्राचीन जगातून एका दुर्मीळ वस्तूचा मागोवा घेतला होता.
इजिप्तची राणी क्लियोपात्रालाही त्याचा इतका मोह होता की, तिने तिच्या जहाजांचे काही भागही या रंगाने रंगवले होते. काही रोमन सम्राटांनी असे फर्मान काढले की, त्यांच्याशिवाय कोणीही हा रंग बाळगला तर त्याला ठार मारले जाईल. या रंगाच्या शोधाला ‘टेरियन पर्पल’ किंवा ‘शेलफिश पर्पल’ असेही म्हणतात. इसवी सन पूर्व 310 च्या रोमन आदेशानुसार, त्याची किंमत इतकी जास्त होती की आजच्या सोन्याच्या किमतीच्या तिप्पट म्हणावी लागेल; पण आता हा रंग कसा तयार होतो हे कोणालाच माहीत नाही. 15 व्या शतकापर्यंत हा रंग तयार करण्याचे तंत्र नष्ट झाले.
ईशान्य ट्युनिशियामध्ये, जेथे कार्थेज नावाचं प्राचीन शहर होतं त्या ठिकाणी राहणारा एक माणूस गेल्या 16 वर्षांपासून एका लहान बागेतील भिंतीवर समुद्रातील गोगलगाय मारत असे. तो त्यांच्या आतून ‘टेरियन पर्पल’ (गडद जांभळ्या) रंगा सारखा पदार्थ काढण्याचा प्रयत्न करायचा. शतकानुशतके हा रंग समाजातील सर्वात प्रभावशाली वर्गासाठी राखीव होता. हा शक्ती, अधिकार आणि संपत्तीचं प्रतीक मानला जायचा. किंचित काळ्या रंगाची छटा असलेल्या गोठलेल्या रक्तासारखा खोल लाल-जांभळा रंग असण्याबद्दल प्राचीन लेखकांचं मत स्पष्ट होतं.
हा विशिष्ट रंग सहजासहजी तयार व्हायचा नाही. त्यामुळेच कदाचित दक्षिण युरोप, उत्तर आफ्रिकेपासून ते पश्चिम आशियापर्यंतच्या विविध संस्कृतींमध्ये त्याला मानाचे स्थान होते. हा रंग फोनिशियन संस्कृतीच्या इतका जवळचा होता की त्याला ‘पर्पल पीपल’ हे नाव देण्यात आले होते. टायरच्या राज्याच्या नावावरून रंगाला नाव देण्यात आले होते. टेरियन पर्पल फक्त तीन प्रकारच्या गोगलगायींपासून तयार करतात आणि या तिन्ही एकाच रंगाच्या नसतात. यामध्ये हेझाप्लेक्स ट्रंक्युलस (निळसर जांभळा), बोलिनस ब्रँडरिस (लालसर जांभळा), तर स्ट्रॉमोनिटा हेमास्टोमा (लाल) यांचा समावेश आहे.