Maharashtra Kesari 2025: पुण्याचा मोहोळ ‘महाराष्ट्र केसरी’Pudhari
Published on
:
03 Feb 2025, 1:42 am
Updated on
:
03 Feb 2025, 1:42 am
डॉ. सूर्यकांत वरकड
नगर: अहिल्यानगरमध्ये रविवारी रात्री रंगलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्याचा बलदंड ताकदीचा युवा मल्ल पृथ्वीराज मोहोळ 67 वा महाराष्ट्र केसरी ठरला. त्याने सोलापूरच्या धिप्पाड शरीरयष्टी असलेल्या महेंद्र गायकवाडचा पराभव केला.
एक-एक गुणाची बरोबरी असताना कुस्तीच्या शेवटच्या चाळीसाव्या सेकंदात पृथ्वीराज मोहोळ याने टाकलेला डाव परतवून लावताना महेंद्र गायकवाड मैदानाबाहेर फेकला गेला. त्यामुळे मोहोळला दोन गुणांची आघाडी मिळाली.
त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला; मात्र पंचांनी तो धुडकावून लावल्याने महेंद्र गायकवाडने मैदान सोडले. पंचांनी तांत्रिक गुणांच्या आधारे पृथ्वीराज मोहोळ याला विजयी घोषित केल्याने पृथ्वीराज मोहोळ 2025 चा महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला.
गादीत गटात अंतिम सामान्यात पराभूत झालेला शिवराज राक्षे आणि अंतिम सामन्यात पराभूत झालेला महेंद्र गायकवाड या दोघांनीही पंचांना लक्ष्य करत मारहाण केली. त्यामुळे पंच आक्रमक झाले आणि आखाड्यातच त्यांनी आंदोलन सुरू केले. दोघांवरही कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती.
महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस व इतरांनी त्यांच्याशी चर्चा केली. कारवाई होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका पंचांनी घेतली. त्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने पैलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड या दोघांना तीन वर्षांसाठी बंदी घालत असल्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पंचांचे आंदोलन थांबले.
राक्षे, गायकवाडवर 3 वर्षांची बंदी
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत पंचांना मारहाण आणि गोंधळ घातल्याप्रकरणी पहिलवान शिवराज राक्षे आणि महेंद्र गायकवाड यांच्यावर तीन वर्षांची बंदी घातली आहे. गादी गटातील अंतिम सामन्यात शिवराजने चितपटचा निर्णय अमान्य करीत पंचांची कॉलर पकडली, त्यांना लाथ मारली. या प्रकारानंतर पंचांनी कारवाईची मागणी करीत आंदोलन केल्यानंतर महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेने बंदीचा निर्णय घेतला.