बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता दोन महिने उलटत आले आहेत. याप्रकरणावरून बीडमधील वातावरण अजूनही तापलेलं असून या हत्येमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही हे प्रकरण लावून धरलं असून याचसंदर्भात त्यांनी एक सूचक ट्विट केलेलं आहे. अंजली दमानिया या उद्या ( मंगळवार) सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर तरी भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया ?
हे सगळे पुरावे अतिशय धक्कादायक आहेत, ते उद्या जनतेपुढे येतील, त्यानंतर नक्कीच मोठा निर्णय घ्यायला जनता सरकारला भाग पाडेल, असा विश्वास अजंली दमानिया यांनी व्यक्त केला. काल देशमुख कुटुंबियांनी महंत नामदेव शास्त्रींची भेट घेतली, वैभवी देशमुखने तिची बाजू मांडली. मात्र त्यानंतर, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला असे नामदेव शास्त्री आता म्हणत आहेत. त्यावरही दमानिया यांनी प्रतिक्रिया दिली. सुरूवातीलच काही वाक्यात ते म्हणाले की मी धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले, त्यांचं अंत:करण बघितलं, पण वैभवीचे डोळे कोण पाहणार, तिच्या डोळ्यातलं पाणी कोण बघणारं , तिचा आधार जन्मभरासाठी निघून गेला आहे. फक्त राजकारणासाठी त्यांनी धनंजय मुंडेंना पाठिंबा दिला, ते मला अतिशय चुकीचं वाटलं अशी टीका दमानिया यांनी केली. तसं व्हायला नको होतं, असं म्हणत दमानिया यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली.
काय आहे प्रकरण ?
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे सध्या बीडच राजकारण ढवळून निघालं आहे.या हत्येमध्ये राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी पक्षातील काही जणांनी केले आहेत. याच मुद्यावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडूनही सातत्याने मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली गेली. अजित पवार यांची भेट घेऊन मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी भूमिका त्यांच्यासमोर मांडली होती. जोपर्यंत धनंजय मुंडेंचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेल असं वाटत नसल्याचं दमानिया यांनी वारंवार स्पष्ट केलं.
तर गेल्या आठवड्यात धनंजय मुंडे यांनी भगवानगडाला शरण गेले. DPDC ची बैठक झाल्यानंतर ते तडक भगवानगडावर मुक्कामी पोहचले. त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. त्यानंतर भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी भक्कमपणे असल्याचा इशारा दिला. त्यांनी धनंजय मुंडे यांना सर्वच प्रकरणात क्लीनचिट दिली.धनंजय मुंडे यांची गुन्हेगारी पार्श्वभूमीवर नाही तरी त्यांना जाणून बुजून गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप झाल्याने संप्रदयाचे नुकसान आहे. भगवान गड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहे,असे ते म्हणाले होते, त्यावरून हे प्रकरण आणखीनच तापलं आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आता अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेऊन काय गौप्यस्पोट करतात, काय पुरावे सादर करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.