Mumbai University | मुंबई विद्यापीठFile photo
Published on
:
03 Feb 2025, 4:26 am
Updated on
:
03 Feb 2025, 4:26 am
मुंबई : Mumbai University | मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील क्रीडा संकुलाची दुर्दशा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे. शनिवारी या क्रीडा संकुलात व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सुरू असताना सिमेंटचा स्लॅब कोसळला. ही घटना घडली, त्यापासून खेळ थोड्या अंतरावर सुरू असल्याने खेळाडू बचावले. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने हा स्लॅब कोसळला नसून भिंतीवरील विटा खिळखिळ्या झाल्याने तो भाग पडल्याचे अजब स्पष्टीकरण दिले.
मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसरातील शारीरिक शिक्षण विभागाच्या क्रीडा संकुलातील बंदिस्त संकुलात शनिवारी आंतरशालेय व कनिष्ठ महाविद्यालय व्हॉलीबॉल स्पर्धेचा अंतिम सामना सुरू होता. त्या वेळी या संकुलातील एका बाजूला असलेल्या भिंतीच्या छताजवळी स्लॅबचा काही भाग कोसळला. या वेळी या भिंतीजवळ कोणीही नसल्याने जीवितहानी टळली आहे. याबाबत वारंवार तक्रारी करुनही याकडे विद्यापीठाने दुर्लक्ष केले आहे. या सभागृहाचे छत कोसळून भगदाड पडल्यानंतर युवासेनेच्या अधिसभा सदस्यांनी पाहणी करत विद्यापीठाच्या कारभारावर टीका केली आहे. या संकुलात विद्यार्थी खेळांडूचा वावर मोठ्या प्रमाणात असतो. असे असूनही विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह इंजिनिअरनी पाहणी करणे गरजेचे होते. मात्र विद्यापीठ याकडे दुर्लक्ष करत आहे. विद्यापीठाचे अधिकारी आपल्याच धुंदीत असल्याची टीका अधिसभा सदस्य सावंत यांनी केली. बहुउद्देशीय सभागृहात मेपल वूड फ्लोअरिंग बसवण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी या लाकडाच्या पट्ट्या उखडल्याने त्यांच्या जागी मेपलवूडऐवजी साध्या लाकडाच्या पट्ट्या लावण्यात आल्या होत्या. तसेच काही ठिकाणी भिंतींजवळील प्लास्टरही उखडले आहे. याच सभागृहाच्या कोपऱ्यातील भिंतीचा काही भाग शनिवारी कोसळला. या वेळी सामना सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये एकच घबराट पसरली.