रात्री घडणारे अपघात, सर्पदंश, प्रसूती, हृदयविकार अशा रुग्णांना तातडीची सेवा मिळणे गरजेचे असतानाही प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने रुग्णांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. तालुक्यात चिचोंडी पाटील येथे ग्रामीण रुग्णालय आहे. जेऊर, चास, रुईछत्तिशी, टाकळी काझी, टाकळी खातगाव, देहरे, वाळकी, देवगाव, मेहेकरी या नऊ गावांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 42 उपकेंद्रेही कार्यरत आहेत. जेऊर, वाळकी, देहरे या ठिकाणी काही प्रमाणात रात्री रुग्णास सेवा मिळते; परंतु इतरत्र रात्री सेवा मिळतच नसल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रातही वैद्यकीय अधिकारी, तसेच कर्मचार्यांची संख्याही अपुरी आहे. टाकळी काझी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तर वैद्यकीय अधिकारीच नियुक्त नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. येथील अतिरिक्त पदभार इतर वैद्यकीय अधिकार्यांकडे दिला जातो. चास, रुईछत्तिशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातही एकच वैद्यकीय अधिकारी नियुक्त आहे. कर्मचार्यांची अपुरी संख्या हा देखील आरोग्य यंत्रणेला भेडसावणारा मोठा प्रश्न आहे.
जेऊर आरोग्य केंद्रात 2018पासून कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया बंद होत्या. त्या 2025मध्ये सुरू झालेल्या आहेत. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठीही रुग्णांना प्रत्येक आरोग्य केंद्रात सुविधा मिळत नाही. अशी खंतही महिला वर्गांमधून व्यक्त करण्यात येत आहे. एकंदरीत तालुक्यातील आरोग्य यंत्रणेला ग्रहण लागल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.