भगवानगड महंतांचे स्पष्टीकरणPudhari
Published on
:
03 Feb 2025, 9:46 am
Updated on
:
03 Feb 2025, 9:46 am
पाथर्डी तालुका :
‘स्व.संतोष देशमुख यांच्या आरोपींना आम्ही पाठीशी घालत नाही. मी काहीही बोललेलो नाही, कदाचित माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला,’ असे स्पष्ट करत महंत डॉ. नामदेवशास्त्री यांनी रविवारी भगवानगड (स्व.) संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या मागे असल्याचे देशमुख कुटुंबीयांना आश्वासित केले. या प्रकरणाला जातीय रंग न देता न्यायासाठी सर्व जण प्रार्थना करू, असे आवाहनही त्यांनी केले.
मंत्री धनंजय मुंडे यांनी डॉ. नामदेवशास्त्री यांची भगवानगडावर शुक्रवारी भेट घेतली, तेव्हा मुंंडे यांचे समर्थन करून ‘आरोपींची मानसिकता अशी का झाली हे तपासण्याची गरज आहे?’ असे वक्तव्य नामदेवशास्त्री यांनी केल्याचे प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. त्या पार्श्वभूमीवर (स्व) देशमुख यांच्या कुटुंबीयांनी रविवारी (दि. 2) दुपारी भगवानगडावर जाऊन महंत डॉ. नामदेवशास्त्री यांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
स्व. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख, मुलगी वैभवी, मुलगा व इतर नातेवाइक या वेळी उपस्थित होते. त्यांची डॉ. नामदेवशास्त्रींशी अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली.
त्या नंतर शास्त्री म्हणाले, की देशमुख यांचे कुटुंबीय भगवानगडाला मानणारे असून नेहमी ते भगवानगडावर दर्शनासाठी येतात. देशमुख कुटुंबीय हे भगवानबाबांना मानणारे आहे. आज मला ते कळाले. देशमुख कुटुंबीयांची जमीन तीन पिढ्यांपासून वंजारी समाजाचे मुंडे कुटुंबीय करीत आहे. भगवानगड सदैव देशमुख कुटुंबीयांच्या मागे आहे. मी काहीही बोललेलो नाही. कदाचित माझ्या वक्तव्याने गैरसमज झाला असेल. मी गुन्हेगाराचे समर्थन करणारा नाही. इतर लोकांनी माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ काढला. संतोष देशमुख यांच्याबाबत केलेला प्रकार समाजातील वाईट लोकांचा आहे. त्यामुळे जातिवाद न करता खर्या आरोपींना शिक्षा व्हावी, असे माझे सांगणे आहे.
माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ झाला असेल; मात्र आरोपींचे कधीही समर्थन करत नाही. आरोपी हे आरोपीच असून ते गुन्हेगार आहेत. हे सांगण्यासाठी देशमुख कुटुंबीय या भगवानगडावर आले. ते गडाचेच कुटुंब आहे, असेही डॉ. नामदेवशास्त्री म्हणाले.
धनंजय देशमुख म्हणाले, की स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्व समाजातील लोक मदत करत आहेत. परंतु ज्याला आरोपींची बाजू घ्यायची आहे, तेच लोक जातिवाद करत आहेत. या प्रकरणात कोणी जातिवाद करत असेल तर त्याला आपण समज द्यावी.
वैभवी देशमुख म्हणाली, गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली. ही वृत्ती समाजातून बाहेर काढायची आहे. या आरोपींना कोणाला समर्थन करायचे असेल तर त्यांच्यावर आम्हाला काही बोलायचे नाही.