भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री. (fIle photo)
Published on
:
03 Feb 2025, 6:56 am
Updated on
:
03 Feb 2025, 6:56 am
बीड : पुढारी वृत्तसेवा; आरोपींना आम्ही माफ करणार नाही. आरोपींना आम्ही पाठीशी घालणार नाही. भगवानबाबांच्या गादीवर बसून आम्ही तुम्हाला शब्द देतो. आरोपीच्या पाठीमागे भगवानगड नाही. संतोष देशमुखांच्या पाठीमागे भगवानगड राहणार आहे. तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही गडाचेच आहात, अशा शब्दांत भगवानगडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांनी देशमुख कुटुंबाला ग्वाही दिली. मस्साजोग येथील देशमुख कुटुंबीयांनी रविवारी (दि.२) भगवानगड येथे नामदेव शास्त्रींची भेट घेतली. त्यावेळी शास्त्रींनी त्यांना आश्वस्त केले.
केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील आठ आरोपी अटकेत असून उर्वरित एक आरोपी अद्यापही फरार आहे. या दरम्यान राजकीय आरोप-प्रत्यारोपही केले जात आहेत. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी विरोधकांकडून केली जात आहे. मंत्री मुंडे यांनी भगवानगड येथे जाऊन महंत नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर महंत नामदेव शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेत भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले होते.
या पत्रकार परिषदेत आरोपींना आधी मारहाण झाली होती, त्यांच्या मानसिकतेचाही विचार व्हायला हवा होता, असे वाक्य उच्चारले गेले होते. यानंतर या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. देशमुख कुटुंबानेही या विषयावर महंत नामदेव शास्त्री यांची आपण रविवारी भेट घेणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास देशमुख कुटुंबाने भगवानगड येथे दाखल होत संत भगवानबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
Santosh Deshmukh Murder Case | घटनेचे पुरावे सादर
यानंतर महंत नामदेव शास्त्री यांच्याशी चर्चा करत त्यांच्याकडे या घटनेच्या संबंधाचे पुरावे सादर केले. यावेळी महंत नामदेव शास्त्री यांनी गड आरोपींच्या पाठीशी नाही तर देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले. यावेळी धनंजय देशमुख तसेच वैभवी देशमुख यांनी महाराजांशी संवाद साधला. यावेळी मस्साजोग येथील ग्रामस्थांचीही उपस्थिती होती.
संतोष देशमुख गडावर येत असत
यावेळी धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हे गडावर दर्शनासाठी येत असत असल्याचे सांगत त्याची छायाचित्रे दाखविली. तसेच आमची शेती वंजारी समाजाचे मुंडे चालवितात, मनोहर मुंडे हे त्यांचे नाव. ते मागील महिन्यातच वारले, त्यांनी जे पिकवले तेच आम्ही खातो. त्यांची पोरं पुण्यात असतात असे सांगितले. वैभवी देशमुख हिने महाराजांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या. जे लोक आले होते ते खंडणी मागण्यासाठीच आले होते. त्यांनी आमच्या दलित बांधवांना मारले म्हणून माझे वडील अडवण्यासाठी गेले, त्यानंतर माझ्या वडिलांनाच मारले एवढेच नाही तर त्यांचे क्रूर हाल करुन त्यांना ठार केले, असे तिने निदर्शनास आणून दिले.