193 देशांच्या ग्लोबल करन्सीसह पोस्टल स्टॅम्प्सचे प्रदर्शनाचा लाभ घेताना विद्यार्थी. (छाया : बजरंग वाळुंज)
Published on
:
03 Feb 2025, 4:54 am
Updated on
:
03 Feb 2025, 4:54 am
डोंबिवली : विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी डावखर इन्फ्रा, रिजन्सी ग्रुप, समर्थ पेट्रोलियम, एनए सोल्युशन, डावखर फाऊंडेशन, डावखर फिल्म यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन तथा पोस्टर्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धांमध्ये 53 शाळांतील तब्बल 30 हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या स्पर्धांना जोडून 193 देशांच्या ग्लोबल करन्सीसह पोस्टल स्टॅम्प्सचे देखिल प्रदर्शन भरविण्यात आले होते.
या प्रदर्शनातील विशेष आकर्षण इंडोनेशिया देशाच्या नोटेवर गणपतीची प्रतिमा आणि कंबोडिया देशाच्या नोटेवर गौतम बुद्ध यांची प्रतिमा तर दीडशे देशांच्या पोस्टल स्टॅम्पवर महात्मा गांधींचे फोटो पाहण्यासाठी गर्दी उसळली होती. कल्याण-शिळ महामार्गावर असलेल्या रिजन्सी अनंतम् येथे दोन दिवसांसाठी भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना विज्ञान विषयात स्वारस्य घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी विशेष आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन, तसेच पोस्टर स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आले होते. जिंकणाऱ्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, पदक, प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देण्यात आले. यंदाच्या प्रदर्शनात 53 शाळा सहभागी झाल्या होत्या. तर 98 प्रोजेक्ट मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे सूत्रसंचालन निवेदक, अभिनेता प्रणव भांबुरे यांनी केले. 5 ते 7 आणि 8 ते 10 अशा 2 गटांमध्ये स्पर्धा झाली. यावेळी दीड लाखांच्या रोख रक्कमांसह पारितोषिके डावखर फाऊंडेशनचे आयोजक संतोष डावखर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
विज्ञान प्रदर्शनात पाण्याचा पुनर्वापर, आधुनिक भौतिक व रसायन शास्त्र, आधुनिक जीवनशैली व त्याचे फायदे-तोटे, आर्ट अँड क्राफ्ट वर्किंग मॉडल्स, पवन ऊर्जा व त्याचा वापर आणि पोस्टर्स स्पर्धेसाठी उद्योगपती स्व. रतन टाटा व त्यांचा तेजस्वी जीवन प्रवास, पॅरालिम्पिकमधील भारताचा प्रवास, सामाजिक न्याय, भारताची सांस्कृतिक विविधता असे विविध विषय देण्यात आले होते. विज्ञान प्रदर्शनात 5 ते 7 वी गटात ओमकार इंटरनॅशनल स्कूल सीबीएससी आणि टिळकनगर विद्यामंदिरसाठी प्रथम क्रमांक विभागून, नूतन ज्ञान मंदिर आणि चंद्रकांत पाटकर विद्यालय यांना द्वितीय विभागून आणि डॉन बॉस्को यांना तृतीय, तर उत्तेजनार्थ म्हणून सेंट झोन हायस्कूललाही गौरविण्यात आले.
आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन तथा पोस्टर्स स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
आठवी ते दहावीच्या गटात प्रथम क्रमांक विभागून कोतकर विद्यालय आणि साई इंग्लिश स्कूल यांना देण्यात आला. द्वितीय मंजुनाथ विद्यालय आणि श्री चैतन्य टेक्नो स्कूल विभागून, तृतीय सिस्टर निवेदिता स्कूल, तर उत्तेजनार्थ म्हणून मातोश्री विद्यालय व गायत्री विद्यालय यांना देण्यात आले. पोस्टर स्पर्धेमध्ये अनुक्रमे पाचवी ते सातवीच्या गटात अचीव्हर हायस्कूल, सेंट जॉन हायस्कूल, बी. आर. मडवी स्कूल यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आणि आठवी ते दहावीच्या गटात साई इंग्लिश स्कूल, बी. टी. गायकवाड स्कूल, सिस्टर निवेदिता स्कूल यांनी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक पटकावला. तर बेस्ट प्रेझेंटर म्हणून पाचते सातवीच्या गटात टिळकनगर शाळेची राधिका वैद्य, शंकरा विद्यालयाची स्वरा तर्वे, तर आठवी ते दहावीच्या गटात प्राची झा, श्री चैतन्य स्कूल, कृष्णा जाधव आणि सेंट जॉन स्कूल यांनी पारितोषिके पटकावली आहेत.