अभिनेता नील नितीन मुकेशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्यासोबत घडलेला विचित्र अनुभव सांगितला. न्यूयॉर्क विमानतळावर काही अधिकाऱ्यांनी त्याला चक्क ताब्यात घेतलं होतं. संबंधित अधिकाऱ्यांनी नीलला त्याच्या राष्ट्रीयत्वाबद्दल प्रश्न विचारला. नीलच्या भारतीय असण्यावर इमिग्रेशन अधिकाऱ्यांना विश्वास बसत नव्हता. नीलकडे भारतीय पासपोर्ट असूनही ते त्याच्या राष्ट्रीयत्वावर शंका उपस्थित करत होते. ‘मॅशेबल इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत त्याने हा किस्सा सांगितला.
याविषयी नील म्हणाला, “जेव्हा मी न्यूयॉर्क या चित्रपटासाठी शूटिंग करत होतो, तेव्हा मला विमानतळावर ताब्यात घेण्यात आलं होतं. माझ्याकडे भारतीय पासपोर्ट असूनही त्यांना माझ्यावर विश्वास नव्हता. मी भारतीय नाही, असं त्यांना वाटत होतं. त्यामुळे तिथे मला ताब्यात घेतल्यानंतर मोठी बातमी झाली होती. ताब्यात घेतल्यानंतर ते मला काहीच बोलू देत नव्हते. माझी बाजू मांडण्याची संधी न देताच इमिग्रेशन अधिकारी माझ्यावर प्रश्नांचा भडीमार करत होते. जवळपास चार तासांपर्यंत त्यांनी मला ताब्यात घेतलं होतं.”
हे सुद्धा वाचा
“चार तासांनंतर ते माझ्याकडे आले म्हणाले, ‘तुला काय म्हणायचंय?’ तेव्हा मी त्यांना इतकंच म्हटलं की माझ्याबद्दल गुगलवर सर्च करा. त्यानंतर त्यांना त्यांचीच खूप लाज वाटली. मग ते माझ्या आजोबांबद्दल, कुटुंबीयांबद्दल आणि वडिलांबद्दल विचारू लागले”, असं त्याने पुढे सांगितलं. नील नितीन मुकेश हा अत्यंत प्रतिष्ठित कुटुंबातून असून त्याचे आजोबा मुकेश हे भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वांत प्रसिद्ध पार्श्वगायकांपैकी एक होते. तर त्याचे वडील नितीन यांनीही पार्श्वगायक म्हणून आपला ठसा उमटवला आहे.
नीलने ‘विजय’ आणि ‘जैसी करनी वैसी भरनी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केलं होतं. 2017 मध्ये ‘जॉनी गद्दार’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत त्याने पदार्पण केलं. त्यानंतर नीलने ‘न्यूयॉर्क’, ‘साहो’, ‘प्रेम रतन धन पायो’, ‘गोलमाल अगेन’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. नीलने हिंदीसोबतच तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलंय. लवकरच त्याचा ‘हिसाब बराबर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अश्विन धीरच्या या चित्रपटात आर. माधवन, किर्ती कुल्हारी, रश्मी देसाई आणि फैजल राशिद यांच्याही भूमिका आहेत.