भारत आणि इंग्लंडमध्ये काल पाचवा T20 सामना झाला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ही मॅच झाली. टीम इंडियाने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला. तब्बल 150 धावांनी टीम इंडियाने हा सामना जिंकला. मैदानात हा सामना रंगलेला असताना प्रेक्षक गॅलरीत एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. एरवी राजकारणाच्या पीचवर परस्परांशी सामना करण्याची एकही संधी न सोडणारे हे राजकारणी वानखेडे स्टेडियमवरच्या प्रेसिडंट बॉक्समध्ये एकत्र बसले होते. महत्त्वाच म्हणजे ही सर्व राजकीय नेते मंडळी हास्य-विनोदात रमली होती. अन्य क्रिकेट प्रेमींप्रमाणे त्यांनी सुद्धा भारत-इंग्लंड सामन्याचा आनंद लुटला.
महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, भाजप नेते कॅबिनेट मंत्री आशिष शेलार, आदिती तटकरे, नमिता मुंदडा, आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर, जितेंद्र आव्हाड, विश्वजित कदम असे सर्व पक्षीय राजकारणी या सामन्याला उपस्थित होते. आशिष शेलार आणि आदित्य ठाकरे हे एकाच रांगेत काही अंतरावर बसले होते. त्यांच्यात हाय-हॅलो झालं. क्रिकेटवरही त्यांच्यात चर्चा झाली, असं कळतय. एरवी एकमेकांवर टीका करणारे हे राजकीय नेते अशावेळी मात्र एकत्र असतात. क्रिकेटच्या पुढे राजकीय शत्रुत्वाच्या तोफा गळून पडतात.
राजकारण हे सतत बदलत असतात
दक्षिणेतील राजकारण अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. मतभिन्नता, कटुता इतकी असते, की संवाद सोडा, राजकीय नेते एकमेकांच तोंडही बघत नाहीत. पण महाराष्ट्रातील राजकारण वेगळं आहे. कौटुंबिक, सांस्कृतिक कार्यक्रमात सत्ताधारी-विरोधी पक्षाचे नेते एकत्र येतात. विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, एकमेकांवर टीका करताना भान राखा. तुमचं राजकीय शत्रुत्व टोक गाठणार नाही याची काळजी घ्या. मैत्री ठेवा. कारण पडद्याच्या पुढे एक राजकारण घडतं, पडद्याच्या मागे वेगळं राजकारण असतं, राजकारण हे सतत बदलत असतं.