पूजा खेडकर प्रकरणामुळे यूपीएससी परिक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आयोगाने बदल केले आहेत. File Photo
Published on
:
03 Feb 2025, 10:29 am
Updated on
:
03 Feb 2025, 10:29 am
नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा : यूपीएससी पूर्व परिक्षा २०२५ साठी लोकसेवा आयोगाने अधिसूचना जारी करुन अर्ज मागवले आहेत. अर्ज भरण्याची शेवटची तारीख ११ फेब्रुवारी आहे. या अधिसूचनेनुसार, अर्ज प्रक्रियेत गेल्यावर्षीच्या तुलनेत काही बदल आयोगाने केले आहेत. या बदलांचे कारण, परिक्षा पद्धती आणि अर्ज प्रक्रियेत बडतर्फ आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरने केलेला गैरप्रकार असल्याचे सांगितले जात आहे. खेडकरने प्रकरणातील गैरप्रकारासारख्या गोष्टी टाळण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले असल्याचे समजते. या बदलांचे स्वागत होत आहे. त्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत. लांबलचक अर्ज प्रक्रियेमुळे विद्यार्थी गोंधळात पडले असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
पूजा खेडकर प्रकरणामुळे यूपीएससी परिक्षा प्रक्रियेतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आयोगाने हे बदल केल्याचे समजते. त्यामुळे यूपीएससी पूर्व परिक्षेसाठीचा अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांना लांबलचक प्रक्रियेतून जावे लागत आहे. पूजा खेडकरने केलेल्या कृत्यामुळे देशभरातील नागरी सेवा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागत आहे.
यूपीएससीने जारी केलेल्या २०२५ पूर्व परिक्षेच्या अधिसूचनेतील सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे अर्ज प्रक्रियेची पुनर्रचना होय. या अगोदरच्या पद्धतीनुसार यूपीएससी पूर्व परिक्षेसाठीचा अर्ज दाखल करताना विद्यार्थ्यांना केवळ प्राथमिक माहिती सादर करावी लागायची. त्यानंतर मुख्य परिक्षेसाठी काही माहिती भरावी लागायची आणि शेवटी मुलाखतीसाठी निवड झाली. तर संपूर्ण माहिती भरावी लागायची. आता मात्र, तिन्हीवेळी भरावी लागायची माहिती एकदाच पूर्व परिक्षेचा अर्ज भरताना सादर करावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांची तारांबळ उडाली आहे.
अर्ज प्रक्रियेत कोणते बदल?
- या अगोदर तपशीलवार अर्ज भाग१ आणि भाग १ (डॅफ-१ आणि डॅफ-२) पूर्व परिक्षेनंतर भरावे लागायचे. मात्र, आता पूर्व परिक्षेचा अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांना डॅफ-१ आणि डॅफ-१ मधील तपशील भरावा लागत आहे.
- विद्यार्थांनी आता पूर्व परीक्षेच्या अर्जासोबत जन्मतारीख पुरावा, आरक्षण प्रमाणपत्र आणि शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र यासारखी कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे. यापूर्वी केवळ आरक्षण प्रमाणपत्र इत्यांदीचा क्रमांक सादर करावा लागायचा.
- मागील वर्षांपर्यंत मुख्य परीक्षेच्या निकालानंतर सेवा प्राधान्ये (सर्व्हिस प्रीफ्रन्स) द्यावा लागायचा. मात्र, आता विद्यार्थ्यांनी पूर्व परिक्षेचाच अर्ज भरताना त्यांच्या सेवा प्राधान्ये निवडणे आवश्यक आहे.
- पूर्व परिक्षेतून पात्र ठरलेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करताना २०० रुपये स्वतंत्रपणे भरावे लागतील (सूट दिलेली श्रेणी वगळता).
- विद्यार्थ्यांना आता पूर्व परीक्षेच्या निकालाच्या १० दिवसांच्या आत त्यांचे कॅडर प्राधान्ये सादर करणे आवश्यक आहे. यापूर्वी, डॅफ-२ मध्ये मुख्य परीक्षेच्या निकालानंतर कॅडर पसंती सादर करावी लागत असे.
‘यूपीएससी’ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
‘यूपीएससी’ने अर्ज प्रक्रियेत केलेले बदल स्वागतार्ह आहेत. यामुळे पूजा खेडकरसारखे गैरप्रकार होणार नाहीत. यूपीएससीच्या सर्व प्रक्रियेत पारदर्शकता येईल.
- गणेश धुमाळ, यूपीएससी विद्यार्थी
अर्ज भरण्याची प्रक्रिया बदलल्याने विद्यार्थ्यांना दहा लोकांना विचारावे लागत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अर्ज भरताना जास्त अडचणींचा सामना करावा लागत आहे.
- विक्रांत बावनकर, यूपीएससी विद्यार्थी
यूपीएससीने केलेल्या बदलांमुळे विद्यार्थ्यांचा खूप वेळ जात आहे. अर्ज भरण्यासाठी आय़ोगाना मार्गदर्शक तत्वे जारी करायला हवी होती.
- अजय पिंपळडोहकर, यूपीएससी विद्यार्थी
माझ्यासारख्या पहिल्यांदाच यूपीएससीचा अर्ज भरणाऱ्या विद्यार्थ्यांना एवढ्या किचकट आणि लांबलचक प्रक्रियेतून जावे लागत असल्याने मनात भीती आणि चिंता आहे. आयोगाने अर्ज प्रक्रिया सोपी आणि सरळ ठेवायला हवी होती.
- साक्षी गोदरे, यूपीएससी विद्यार्थी
बदललेल्या अर्ज प्रक्रियेमुळे मुलांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात एकदाच माहिती भरावी लागत असल्याने विद्यार्थ्यांना काही चुकेल का ? याची भीती वाटत आहे. या अगोदर विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन करताना मुख्य आणि मुलाखतीसाठी टप्प्या टप्प्याने मार्गदर्शन करायचो. मात्र, आता सर्व विद्यार्थ्यांना पूर्व परिक्षेचा अर्ज भरतानाच मार्गदर्शन करावे लागत आहे. चांगल्या हेतूने यूपीएससीने हे बदल केले आहेत. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर माहिती एकदाच भरुन घेण्याची गरज नव्हती.
-आदेश मुळे, संचालक आयएएस दिल्ली इन्स्टीट्यूट