भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे. एका हेल्थ रिपोर्टनुसार सध्या देशात 13 कोटींहून अधिक लोक मधुमेहाने त्रासले आहेत. यामध्ये 6 कोटींहून अधिक संख्या ही महिलांची आहे. कारण गर्भवती महिलांमध्ये मधुमेह होण्याचं प्रमाण जास्त असतं.
गरोदरपणात महिलांना जेस्टेशनल डायबिटीस का होतो?
गर्भधारणेदरम्यान, शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे इन्सुलिन निर्मितीची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे वजन झपाट्याने वाढू लागतं आणि शरीर पुरेसे इन्सुलिन तयार करू शकत नाही, त्यामुळे साखरेची पातळी वाढू लागते, त्यामुळे गरोदरपणात महिलांना मधुमेहाचा त्रास होतो. ज्याला जेस्टेशनल डायबिटीस असं म्हणतात.
याचा परिणाम नवजात बालकांवरही होतो. नवजात मुलांमध्येही मधुमेहाचा धोका वाढतो. मधुमेहामुळे बाळाला जन्मानंतर रक्तातील साखर कमी होण्याचा किंवा कावीळ होण्याचा धोका असू शकतो. याशिवाय बाळाला श्वास घेण्यासही त्रास होणे किंवा जन्मानंतर लठ्ठपणाचा धोका वाढतो.
बाळावर काय परिणाम होऊ शकतो?
जेव्हा गरोदर महिलांना मधुमेह असतो तेव्हा स्वादुपिंडावर इन्सुलिन तयार करण्यासाठी अधिक दबाव असतो. इन्सुलिन तयार करण्यासाठी स्वादुपिंडाला अधिक मेहनत करावी लागते, तरीही इन्सुलिन रक्तातील साखरेची पातळी कमी करत नाही. अशा परिस्थितीत बाळाला प्लेसेंटा ग्लुकोजसह अनेक पोषक द्रव्ये योग्य स्वरूपात उपलब्ध होत नाहीत. अशा परिस्थितीत, वाढलेली साखरेची पातळी काढून टाकण्यासाठी बाळाचे स्वादुपिंड अधिक इन्सुलिन तयार करू लागते. कारण आईने घेतलेले अन्न रक्ताद्वारे बाळापर्यंत पोहोचतं आणि बाळामध्ये चरबी जमा होऊ लागते. त्यामुळे जन्मानंतर बाळालाही याचा त्रास होऊ शकतो.
गरोदर महिलेतील मधुमेहाची लक्षणे काय?
बहुतेक गर्भवती महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसत नाहीत. मात्र अशी काही लक्षणे असतात ज्यांच्या मदतीने तुम्ही याचा अंदाजा लावू शकता. जसं की, महिलांना जास्त तहान लागल्यास आणि वारंवार लघवीची समस्या असल्यास त्यांनी त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. गर्भवती महिलांनी दर तीन महिन्यांनी मधुमेहाची तपासणी करून घ्यावी, यामुळे महिलांची साखरेची पातळी आणि बाळाच्या आरोग्याविषयी जाणून घेण्यात मदत होते.
आईची साखरेची पातळी वाढली तर बाळावर परिणाम होतो
बाळाला पोषण फक्त आईच्या रक्तातूनच मिळते. जर आईच्या साखरेची पातळी जास्त असेल तर त्याचा परिणाम नवजात बाळावरही होतो. अशा परिस्थितीत, कधीकधी बाळाचा आकार सामान्य आकारापेक्षा मोठा होतो.
ज्यामुळे अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात. बाळाचा आकार मोठा असल्यास प्रसूतीदरम्यान धोकाही निर्माण होऊ शकतो, शिवाय त्या महिलेली प्रसुतीच्यावेळी वेदनाही प्रचंड प्रमाणात होतात. एवढच नाही तर या डायबिटीसमुळे सिझेरियन डिलिव्हरी होण्याची शक्यता वाढते अथवा बाळाची साखर तरी कमी होते.
गरोदर महिलेला झालेला मधुमेह कायमचा राहतो का?
वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन गरोदरपणातच जेस्टेशनल डायबिटीस कसा कमी होईल याकडे लक्ष दिले तर नक्कीच फायदा होतो. पण डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपला आहार पाळा म्हणजे बाळाच्या जन्मानंतर हा डायबिटीस कमी होण्यास किंवा नाहीच्या बरोबर होण्यास नक्कीच मदत होते. पण मनाने औषधोपचार करणे टाळा आणि डॉक्टरांच्याच सल्ल्याने आपला डाएट पाळा.