चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादातून राजस्थानातील दोन प्रवाशांवर जमावाने चाकूने वार केल्याची घटना घडलीPudhari News Network
Published on
:
03 Feb 2025, 10:21 am
Updated on
:
03 Feb 2025, 10:21 am
नंदुरबार : चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये जागेच्या वादातून राजस्थानातील दोन प्रवाशांवर जमावाने चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना नंदुरबार स्थानकात रविवारी (दि.2) सायंकाळी घडली होती. सोमवार (दि.3) रोजी पहाटेच्या दरम्यान यातील एका जखमीचा मृत्यू झाला. दरम्यान, आरोपींना अटक करीत नाही तोपर्यंत हलणार नाही, अशी ठाम भूमिका मृत प्रवाशाच्या नातलगांनी घेतली असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. यामुळे रेल्वे आणि शहर पोलिसांची धावपळ वाढली आहे.
सुमेरसिंग जब्बरसिंग (26, रा. बाकेसर, जिं. जोधपूर) असे मरण पावलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी नंदुरबार लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल असून परबतसिंग डोंगरसिंग पडियार (40) या दुसऱ्या प्रवाशावर अद्याप जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुमेर सिंग याच्या पायावर गंभीर वार झाला असल्यामुळे अती रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. रेल्वे पोलीस दलाचे येथील प्रमुख अधिकारी शेजवळ हे अधिक तपास करीत असून संतप्त नातलगांची समजूत काढत आहेत.
हल्ला करणाऱ्यांची संख्या जवळपास सहा ते सात असून ते सगळे नंदुरबार शहरातील असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तसेच रेल्वे स्थानका बाहेरील सीसीटीव्ही फुटेज मिळून तपासाला गती देण्यात आली. त्यामुळे रविवारी (दि.2) रात्रीपासून सोमवारी (दि.3) सकाळपर्यंत झालेल्या तपास कामातून हल्लेखोर संशयित जवळपास नजरेच्या टप्प्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. ठोस पुरावा हाती येणे बाकी असल्यामुळे आज सोमवारी (दि.3) सायंकाळ पर्यंत आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी देखील शहरातील चौकांमध्ये वाहन तपासणी सुरू करून संशयीतांचा शोध घेण्याला गती दिली. संशयितांना लवकरच जेरबंद करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.
प्राप्त माहितीनुसार रविवार (दि.2) रोजी चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये भुसावळहून बसलेल्या एका प्रवाशाचा एक्स्प्रेसमध्ये जनरल बोगीतून प्रवास करणाऱ्या इतर दोन प्रवाशांशी जागेवरून वाद झाला. हा वाद वाढत गेला. रविवार (दि.2) सायंकाळी एक्सप्रेस नंदुरबार स्थानकात आल्यावर संबंधित प्रवाशाने त्याच्या मित्रांना बोलवून घेतले. चार ते पाच जणांनी थेट जनरल बोगीत प्रवेश करून दोघा प्रवाशांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोघांवर चाकूनेही वार करण्यात आला. त्यात एकाच्या मांडीवर तर दुसऱ्याच्या हातावर गंभीर जखमा करण्यात आल्या. हा प्रकार सुरू असतांना बोगीतील प्रवाशांमध्ये एकच धावपळ उडाली. वाढता गोंधळ लक्षात घेता मारहाण करणाऱ्यांनी गर्दीचा फायदा घेत पलायन केले. लोहमार्ग पोलिसांना व रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती कळताच दोन्ही पोलिस ठाण्यांचे कर्मचारी बोगीत धावले. जखमींना लागलीच रुग्णवाहिका बोलावून जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.