भारताने इंग्लंडविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका 4-1 ने खिशात घातली. भारताने या मालिकेत इंग्लंडला कमबॅक करण्याची संधीच दिली नाही. पाचवा सामना जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न होता. मात्र भारताने पाचव्या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली. या सामन्यात भारताने आक्रमक खेळी करत 20 षटकात 9 गडी गमवून 247 धावा केल्या. या सामन्यात अभिषेक शर्माने 135 धावांची आक्रमक खेळी केली. इतकंच काय तर इंग्लंडला 97 धावांवर गुंडाळलं आणि सामना 150 धावांनी जिंकला. या विजयानंतर गौतम गंभीरच्या विधानाकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दृष्टीने आता इंग्लंडविरुद्ध वनडे मालिका होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात सिनिअर खेळाडू संघात असणार आहेत. असं असताना गौतम गंभीर काय बोलतो याकडे लक्ष होतं. टी20 मालिका विजयानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरने सांगितलं की, आम्ही कोणतीही भीती न बाळगता क्रिकेट खेळत राहू आणि या दरम्यान 120 धावांवरही आऊट झालो तरी वाईट गोष्ट नाही.
‘आम्ही नियमितपणे 250-260 धावांपर्यंत मजल मारण्यासाठी प्रयत्नशील आहोत. असा प्रयत्न करत असातना आम्ही काही ठिकाणी 120-130 धावांवरही ऑल आउट होऊ शकतो. पण जिथपर्यंत तुम्ही हाय रिस्क क्रिकेट खेळत नाही, तोपर्यंत तुम्हाला मोठे रिवॉर्ड्सही मिळणार नाहीत.’, असं गौतम गंभीर याने सांगितलं. त्यामुळे गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली वनडे मालिकेतही असाच अंदाज पाहायला मिळेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका आहे. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचं बिगुल वाजणार आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली ही पहिली आयसीसी स्पर्धा आहे. त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडिया कशी कामगिरी करेल याकडे लक्ष लागून आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत. त्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. मात्र त्यांचा फॉर्म पाहता पुढचं गणित खूपच किचकट असणार आहे. भारताच्या कामगिरीची परीक्षा इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत दिसून येणार आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीत जेतेपद मिळवण्यासाठी पाच विजय आवश्यक आहेत. तर उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारताने साखळी फेरीत तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवावाच लागेल. भारताचा पहिला सामना बांगलादेशशी आहे. त्यानंतर पाकिस्तान आणि न्यूझीलंड सामोरं असेल.