Published on
:
03 Feb 2025, 12:29 pm
Updated on
:
03 Feb 2025, 12:29 pm
भंडारा: बुकिंग पावती असूनही मागणी केलेले अधिकचे पैसे न दिल्याने ट्रकमध्ये वाळू भरून देण्यास डेपोतील कर्मचाऱ्याने नकार दिल्याचा प्रकार पवनी तालुक्यातील इटगाव वाळू डेपोत घडला. याची तक्रार तहसीलदारांकडे करण्यात आली. त्यानंतर मात्र डेपो चालक नरमला व त्याने वरचे पैसे न घेता ट्रकमध्ये वाळू भरून दिली.
शासनमान्य वाळू डेपोंमध्ये शासनाने ठरवून दिलेल्या वाळूच्या दराच्या दुपटीपेक्षा अधिक रक्कम ग्राहक व मोटार मालक यांच्याकडून वसूल करण्यात येत आहे. महसूल व गौण खनिज विभागाच्या आशीर्वादाने सुरु असलेल्या या लुटीमुळे मोटार मालक व ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डेपो चालकांच्या सुरु असलेल्या लूट व मनमानीचे असेच प्रकरण पवनीच्या तहसील कार्यालयापर्यंत पोहचले.
नागपूर येथील एका ग्राहकाने ३० जानेवारीला इटगाव डेपोमधून ५ ब्रास वाळू बुक केली. त्यासाठी डेपो व्यवस्थापन शुल्क, जिल्हा खनिज प्रतिष्ठान शुल्क व वाळूचे मिळून एकूण १० हजार ११० रुपये बुकिंग करताना शासनाकडे ऑनलाईन जमा केले. वाळू भरून आणण्यासाठी भाड्याने ट्रक केला. बुकिंग पावती घेऊन ट्रक चालक वाळू भरायला इटगाव डेपोमध्ये गेला. तेव्हा डेपोमधील कर्मचाऱ्यांने नेहमीप्रमाणे ट्रक चालकाकडे प्रती ब्रास २ हजार ५०० रुपयेप्रमाणे ५ ब्राससाठी १२ हजार ५०० रुपयांची मागणी केली. हे अतिरिक्त पैसे देण्यास ट्रक चालकाने नकार दिला. त्यावर कर्मचाऱ्यांने वाळू भरून मिळणार नसल्याचे सांगितले व वजन करण्यासाठी काट्यावर लावलेला ट्रक मागे घ्यायला लावला. कर्मचाऱ्याच्या या मनमानीविषयी ट्रक चालकाकडून पवनीचे तहसीलदार महेंद्र सोनोने यांच्याशी संपर्क साधला. सोनोने यांनी लगेच डेपो व्यवस्थापकाशी फोनवर संपर्क साधला व अतिरिक्त पैशाच्या मागणीचे कारण विचारत त्याची कानउघाडणी केली. त्यानंतर मात्र डेपोचालक नरमला व अतिरिक्त पैसे न घेता त्याने ट्रकमध्ये वाळू भरून दिली.
डेपोमध्ये सुरु असलेली लूट थांबविण्यासाठी मागील आठवड्यात ट्रक, ट्रॅक्टर चालक मालक संघटनेने विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यानंतरही डेपोतील लूट थांबलेली नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तक्रारीची दखल घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने मोटार मालकांमध्ये असंतोष वाढू लागला आहे.