कोल्हापूर ः पालकमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांना निवेदन देताना हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष मधुकर चव्हाण व समितीचे सदस्य. डावीकडून आ. अमल महाडिक, आ. चंद्रदीप नरके, खा. धैर्यशील माने आदी. ( छाया : पप्पू अत्तार)
Published on
:
03 Feb 2025, 1:38 am
Updated on
:
03 Feb 2025, 1:38 am
कोल्हापूर ः कोल्हापूर शहराच्या प्रस्तावित हद्दवाढीस 20 गावांतील लोकप्रतिनिधींचा विरोध आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हद्दवाढीचा निर्णय ग्रामीण जनतेवर लादू नका, त्याऐवजी प्राधिकरण सक्षम करा, अशी मागणी हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सहपालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सर्व लोकांना विश्वासात घेऊनच याबाबतीत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले. यावेळी आमदार चंद्रदीप नरके, आमदार अमल महाडिक, खासदार धैर्यशील माने उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारात हद्दवाढ विरोधी कृती समितीचे शिष्टमंडळ त्यांना भेटले. या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारल्यानंतर पालकमंत्री आबिटकर म्हणाले, हद्दवाढीसाठी कोल्हापूर महापालिका आणि कोल्हापूर शहरातील सर्वपक्षीय नागरी कृती समिती आग्रही आहे. त्याचबरोबर प्रस्तावित गावांतील लोकप्रतिनिधींचा या हद्दवाढीला विरोध आहे. त्यामुळे हद्दवाढीसंदर्भात निर्णय घेताना ग्रामीण-शहरी अशा सर्वच लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घ्यावा लागणार आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, 2017 ला प्राधिकरण स्थापन करताना 42 गावांचा मास्टर प्लॅन तयार करण्याचे ठरले होते. त्या माध्यमातून गावांचा विकास होणार आहे. हे प्राधिकरण अगोदर सक्षम करावे, पालकमंत्री स्वत: त्याचे अध्यक्ष असतात. पालकमंत्री म्हणून तुम्ही प्राधिकरणाची बैठक लावा, म्हणजे या बैठकीत प्राधिकरणातील विकासावर चर्चा करता येईल.
हद्दवाढ विरोधी कृती समितीचे अध्यक्ष उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, प्रस्तावित सर्व गावांतील लोकप्रतिनिधींचा हद्दवाढीला विरोध आहे. हद्दवाढीचे हे भूत कायमचे गाडले पाहिजे. प्राधिकरणच अधिक सक्षम करा. प्राधिकरणामार्फतच गावांचा विकास व्हावा. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, आमदार, खासदार फंडातून ग्रामीण भागाचा विकास होत आहे. याउलट शहरातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामुळे हद्दवाढ करू नये. यावेळी नारायण गाडगीळ, राखी भवड, अमर मोरे, संगीता पाटील, उत्तम आंबवडे, राहुल पाटील, सचिन पाटील, तानाजी पाटील आदी उपस्थित होते. शिष्टमंडळाने हद्दवाढीला विरोध करणारे निवेदन यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना दिले.