बिंदू चौकात सुसज्ज पार्किंग होणार
Published on
:
03 Feb 2025, 1:51 am
Updated on
:
03 Feb 2025, 1:51 am
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी येणार्या भाविक आणि कोल्हापुरात पर्यटनासाठी येणार्या पर्यटकांसाठी बिंदू चौकात सुसज्ज पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात ऐतिहासिक घटनांचा, वास्तूंचा साक्षीदार असलेल्या बिंदू चौकात त्याच धर्तीवर पार्किंग प्लाझा उभारला जाईल.
कोल्हापुरात दररोज सरासरी 50 हजारांवर भाविक, पर्यटक येत असतात. शनिवार-रविवारसह जोडून आलेल्या सुट्ट्या, विविध सण, उत्सव तसेच नवरात्रोत्सव आदी कालावधीत ही संख्या लाखांवर जाते. शहरात येणार्या भाविक, पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे, त्या तुलनेत शहरातील पाकिर्र्ंगची समस्या आणखी कठीण होत चालली आहे. महापालिकेच्या वतीने ताराबाई रोडवरील बहुमजली पाकिर्र्ंगचे काम सुरू आहे. ही सुविधा वर्षभरात उपलब्ध होईल; मात्र ही सुविधाही अपुरी ठरेल अशी शक्यता आहे. यामुळे सध्या बिंदू चौकात असलेल्या पाकिर्र्ंगचा विस्तार करण्याचे नियोजन आहे. याकरिता कारागृह स्थलांतरित करण्यात येणार आहे. याठिकाणी पाकिर्र्ंगची आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कारागृह स्थलांतर प्रक्रिया मध्यतंरी काहीशी संथ झाली होती.याबाबतचे वृत्त दै. ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते. त्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या प्रक्रियेला आता गती आली आहे. या कारागृहासाठी मंगळवार पेठेतील पद्माळा येथे असलेल्या जागेत इमारत बांधणीसाठी जागा मागणीचा प्रस्ताव कारागृह विभागाच्या अपर महासंचालकांना सादर करण्यात आला आहे. याचबरोबर या कारागृहासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अंदाजपत्रकही तयार करण्यात आले आहे.
कारागृह प्रशासनाने सादर केलेल्या या प्रस्तावाला गती दिली जाईल. हा प्रस्ताव मंजूर केला जाईल. त्यातून शहरासाठी सुसज्ज आणि प्रशस्त असे कारागृहही होईल आणि भाविक, पर्यटकांसाठी चांगली पाकिर्र्ंगची सुविधा देण्यासाठी जागाही उपलब्ध होईल.
प्रकाश आबिटकर, पालकमंत्री
बिंदू चौकात असलेले कारागृह मंगळवार पेठेतील पद्माळा येथील जागेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव आहे. त्याकरिता या नव्या जागेचा प्रस्ताव कारागृह प्रशासनाने अपर महासंचालकांना सादर केला आहे. तो मंजूर झाला, तर कारागृह स्थलांतरित होईल आणि त्या जागेवर पार्किंगची चांगली व सर्व सोयींनी युक्त सुविधा उपलब्ध करून देता येईल.
अमोल येडगे, जिल्हाधिकारी, कोल्हापूर