सन्मानजनक मृत्यूसाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे कर्नाटक सरकारचे आदेश
Published on
:
03 Feb 2025, 1:48 am
Updated on
:
03 Feb 2025, 1:48 am
बंगळूर :
इतकेच मला जाताना
सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका
जगण्याने छळले होते!
कविवर्य सुरेश भट यांच्या या काव्यपंक्ती दुर्धर आजारामुळे रोज मरण पाहणार्यांच्या भावना व्यक्त करतात. त्यांना सन्मानजनक मृत्यू मिळावा यासाठी त्यांच्या इच्छामरणाची तशी अंतिम इच्छा! तीही अपुरी राहते अनेकदा! पण कर्नाटक सरकारने अशा स्थितीत सन्मानजनक मृत्यूची अपेक्षा करणार्या अर्जांचा विचार करण्यासाठी राज्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे इच्छामरणाची इच्छा पूर्ण करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. घटनेच्या 21 व्या कलमांत जगण्याचा हक्काचा समावेश आहे. त्यात सन्मानजनक मृत्यूचा हक्क अंतर्भूत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने 2023 मध्ये दिले होते. त्या आदेशाच्या अनुषंगाने कर्नाटक सरकारने हे आदेश दिले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनेच्या अनुसार हा ऐतिहासिक आदेश काढण्यात आल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू यांनी सांगितले. आजारातून बरे होण्याची शक्यताच नाही, असा दुर्धर आजार असणार्यांना किंवा ज्यांची अवस्था कायम दोलायमान असते आणि ज्यांना वाचवण्याच्या कोणत्याच प्रयत्नांना यश मिळत नाही, अशा व्यक्तींना यामुळे मरण तरी सन्मानजनक मिळेल, अशी भावना राव यांनी व्यक्त केली. कायदेशीर आणि वैद्यकीय नियमांच्या चौकटीतून ज्यांना सुटका हवी आहे, अशा अत्यवस्थ रुग्णांसाठी ही सूचना आहे. नैतिकता आणि कायद्याच्या सीमारेषेत राहून हा जीवन अंताचा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
कर्नाटक हे सन्मानजनक मृत्यूची परवानगी देण्याची तयारी करणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या निर्णयाने रुग्णशय्येवर खितपत पडलेल्या शेकडो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.