नऊ वर्षांपूर्वी महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळला. ती भीषणता आठवली तर आजही अंगावर रोमांच येतात. या दुर्घटनेतून प्रशासनाने काहीच बोध घेतला नसून शहापूरमधील भातसा नदीवरील सापगाव पुलाभोवती ‘सावित्री’सारखा धोका पिंगा घालत आहे. पूल जीर्ण झाला असून संरक्षक कठडे तुटले आहेत. पुलावर खड्डे पडले आहेत. लोखंडी रेलिंग गंजून सडले आहेत. पुलाच्या भिंतीत झाडाझुडपांची मुळे खोलवर गेली आहेत. बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या सापगाव पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. हा जीर्ण बांधकाम झालेला पूल त्वरित पाडून या ठिकाणी नवीन पूल बांधणे गरजेचे आहे. या मार्गावर अहोरात्र वाहनांची वाहतूक सुरू असते. शहापूर शहरातून किन्हवली, डोळखांब, सरळगाव व मुरबाड या शहरांकडे जाण्यासाठी या पुलावरूनच एकमेव मार्ग आहे. शहापूर व मुरबाड या दोन्ही तालुक्यांना सापगाव पुलाने जोडले आहे. या मार्गावर रोज शेकडो प्रवासी, वाहनचालक, नागरिक येथून प्रवास करतात. शहापूर शहरात येण्यासाठी या एकमेव पुलाचा वापर केला जातो. मात्र या पुलाची दैन्यवस्था झाली आहे.
वय वर्षे 67
शहापूर, किन्हवली, डोळखांब, मुरबाड या मार्गावर जोडणाऱ्या शहापूरजवळील भातसा नदीवरील सापगाव पूल 1958 साली बांधण्यात आला. 67 वर्षे या पुलाला झाली असून तो आता अखेरच्या घटका मोजत आहे. देखभाल दुरुस्तीअभावी पुलाची प्रचंड दुर्दशा झाली आहे.
भातसा नदीवरील सापगाव पुलाची दैन्यावस्था पाहता येथे मोठ्या दुर्घटनेची भीती आहे. रस्ते विकास महामंडळाने तातडीने हा धोकादायक पूल पाडून नवीन पुलाची बांधणी करणे गरजेचे आहे.
लक्ष्मण शेरे, ग्रामस्थ