Published on
:
03 Feb 2025, 4:57 am
Updated on
:
03 Feb 2025, 4:57 am
खानिवडे : प्रवाशांनी भरलेल्या एका धावत्या एस टी बसचे डाव्या बाजूकडील पुढील चाकच निखळल्याने अपघात झाला. मात्र सुदैवाने बस १५-२० फूट पुढे जाऊन तीन चाकांवर स्थिरावल्याने प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. बसमधील प्रवाश्यांना जोरदार धक्का बसला तरी कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. वज्रेश्वरी-वसई मार्गावरील पारोळ गावाजवळ हा अपघात घडला.
या थरारक घटनेत धावत्या एसटी बसचे चाक अचानक निखळल्याने बस अनियंत्रित झाली. मात्र ३० प्रवाशांची भीतीने गाळण उडाली होती. सुदैवाने बसचालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रित केली आणि मोठी दुर्घटना टळली. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेजची चित्रफित सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही एसटी बस वज्रेश्वरीहून वसईकडे भरधाव जात असताना पारोळ गावाजवळ अचानक बसचा पुढील टायर निखळला. टायर बसपासून सुटल्याने बस डळमळू लागली आणि प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, चालकाने तातडीने बस नियंत्रणात आणून सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी हा प्रकार घडला तो मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या जवळच्या अंतरावर होता. जर ही घटना महामार्गावर भरधाव वेगाने घडली असती, तर मोठा अपघात घडण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. या घटनेनंतर प्रवाशांनी एसटी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या व धोकादायक बस हटवून नव्या आणि सुरक्षित बसगाड्या उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. एसटी बसच्या बहुतांशी बसेस या रस्त्यातच बंद पडत आहेत. नादुरूस्त बसेसमुळे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, नागरिकांचे हाल होत आहेत.