दिलासादायक! जीबीएसच्या 38 रुग्णांना डिस्चार्जfile photo
Published on
:
03 Feb 2025, 4:59 am
Updated on
:
03 Feb 2025, 4:59 am
पुणे: राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोम या मेंदूविषयक आजाराने गेल्या काही दिवसांत चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. दररोज रुग्णसंख्येमध्ये नऊ ते दहा रुग्णांची वाढ होत आहे. दिलासादायक बाब म्हणजे जीबीएसमधून बरे होत असलेल्या 38 रुग्णांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णांची संख्या 28 वरून 21 पर्यंत घटली आहे.
जीबीएस आजाराच्या नवीन नऊ रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्णसंख्या 158 इतकी नोंदवली गेली आहे. यापैकी 83 रुग्ण महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमधील आहेत. उर्वरित 31 रुग्ण पुणे महापालिका, 18 पिंपरी चिंचवड महापालिका, 18 रुग्ण पुणे ग्रामीणमधील आहेत. इतर जिल्ह्यांमधील रुग्णसंख्या आठ आहे. एकूण रुग्णांपैकी 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत, तर 48 रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत.
सर्वेक्षण अन् उपाययोजना
घरोघरी सर्वेक्षण करून आजपर्यंत पुणे पालिकेतील 40 हजार 802 घरे, पिंपरी- चिंचवड महापालिकेतील 11 हजार 203 घरे आणि पुणे ग्रामीणमधील 12 हजार 571 अशा एकूण 64 हजार 567 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. शहराच्या विविध भागांमधील 160 पाणी नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी पाण्याचे आठ नमुने पिण्यास अयोग्य आहेत.